
जालना लोकसभा निरीक्षकांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी
१८ जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय जालना लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक राजेशकुमार यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री व सिल्लोड हे विधानसभाक्षेत्र १८ जालना या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. या क्षेत्रातील निवडणूक तयारीचा आढावा आज निरीक्षक राजेशकुमार यांनी घेतला.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, अपर जिल्हाधिकारी जालना श्रीमती मैत्रेयवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, पैठण, फुलंब्री व सिल्लोड येथील सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र, त्यांची तपासणी, त्यात निर्माण करण्यात आलेल्या सुविधा, वाहन व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा अहवाल, गृह मतदानासंदर्भात राबविलेल्या प्रक्रियेची माहिती, कर्मचाऱ्यांचे यादृच्छिकीकरण, निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अशा विविध मुद्यांचा त्यांनी आढावा घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी माहितीचे सादरीकरण केले.
०००००



