
पशुधन पर्यवेक्षकास उपसरपंचाची जबर मारहाण नाव्हा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात ध्वजारोहण केल्याचा राग सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल
जालना : महाराष्ट्र दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखान्यात पर्यवेक्षकाने ध्वजारोहण केल्याचा राग धरुन उपसरपंच अनिल सदाशिव सरकटे याने मारहाण करुन दवाखान्याला कुलुप लावण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील नाव्हा येथे बुधवारी सकाळी घडला. विशेष म्हणजे उपसरपंच हा भाजपचा कार्यकर्ता असून, त्यांच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने भादंवि ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल तातेराव सांगुळे (वय 54 वर्ष) हे सहा महिन्यां पासुन नाव्हा येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाणा श्रेणी २ येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणुण कार्यरत आहे. १ मे रोजी सकाळी 7.45 वा सुमारास नाव्हा येथे गणेश भास्कराव गाढेकर, रामदास रोहीदास काळे, अमोल दत्तात्रय कुलवंत, विकास गंगाधर काळे यांच्यासह सुनील सांगुळे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम आटोपुन दोरी खांबाला बांधत असतांना तेथे उपसरपंच अनिल सदाशिव सरकटे हे तेथे गावातील काही नागरिकांसह आले. तुम्ही मला झेंडावंदनसाठी का बोलविले नाही, असे बोलुन सांगुळे यांना शिवीगाळ करुन त्यांच्या शर्टाची कॉलर धरुन चापटाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शर्टाचा खिसा फाडला. लगेच अनिल सरकटे यांनी पशुवैद्यकीय दवाखाण्यामध्ये असलेले कुलुप घेवुन दवाखाण्याला लावुन दवाखाणा बंद करुन तुम्ही दवाखाण्यातुन बाहेर निघा नाहीतर तुम्हाला जिवे मारुन टाकील, अशी धमकी दिल्याचे सुनील सांगुळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावेळी कैलास भुर्तेकर, विष्णु दादा भुतेकर, पुंजाराम भुतेकर यांनी मध्यस्थी करून अनिल सरकटे यांना पकडून भांडण सोडविले. हा प्रकार घडल्यानंतर पर्यवेक्षक सुनील सांगोळे यांनी तालुका जालना पोलीस ठाणे घाटात उपसरपंच आणि सरकटे यांच्या विरोधात त फिर्याद दिली. या फिर्यादीवरून उपसरपंच अनिल सरकटे विरुद्ध भादवी 353, 506 , 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



