
मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन द्वारे EVM/VVPAT विषयी जनजागृती
राज्य प्रतिनिधी
रायगड (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 7विधानसभा मतदार संघात EVM व VVPAT मशीनचे मतदारांना प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती करण्याकरिता EVM प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन तयार करण्यात आली आहे. या मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन 15 तालुक्यातील 7 विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे. आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून या जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ केला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने,उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते.
10 ऑक्टोबर पर्यंत ही मोबाईल व्हॅन 15 तालुक्यातील गावे, वाड्या, वस्ती येथे भेट देऊन ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट बाबत जनजागृती करणार आहे. या मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिक करता येणार आहे. तसेच EVM प्रात्यक्षिक केंद्र प्रत्येक विधानसभा मतदार संघस्तरावर मतदारांना प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या क्षेत्रात,गाव व शहरातील मुख्य चौक, बाजार, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये, सभांच्या ठिकाणी इत्यादी मोक्याच्या ठिकाणी मोबाइल व्हॅनव्दारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना अभिरुप मतदान करण्यासाठी ईव्हीएम जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. याचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त मतदारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
०



