
१०८ औरंगाबाद(पश्चिम) विधानसभा स्वीप उपक्रम-मतदान करणे हे आपले आद्यकर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
राज्य प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, :- देशाचे युवक हे देशाचे भविष्य आहेत. तेव्हा आपले भवितव्य ठरवणारे आपले लोकप्रतिनिधी कोण असणार याची निवड करण्याची संधी ही आपल्याला निवडणूकीच्या निमित्ताने मिळते. यासंधीचे सोने करीत आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज एमआयटी महाविद्यालयात केले.
एमआयटी येथे आज १०८ औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदार संघा अंतर्गत स्वीप अर्थात मतदार जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, एमआयटीचे महासंचालक मुनिश शर्मा, उपकुलसचिव मकरंद वैष्णव, स्वीप नोडल अधिकारी दीपाली थावरे आदी यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या संगित विभागाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीपर भारुड व गीते सादर करुन उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मतदार जनजागृतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही जिल्हाधिकारी स्वामीयांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपले मतदान करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. युवकांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य वापरायला हवा. मतदानाप्रति युवकांमध्ये उत्साह असायला हवा. त्यांनी आपल्या मताचा हक्क वापरतांना आपल्या सभवतालच्या लोकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे,असे आवाहन त्यांनी केले.
०००००



