
१०७ औरंगाबाद(मध्य) विधानसभा स्वीप उपक्रम शिक्षकांनी मतदार जनजागृतीत योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- शिक्षक म्हणून निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी पार पाडत असतांना शिक्षकांनी मतदार जनजागृती उपक्रमातही आपले योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शिक्षक मेळाव्यात केले.
येथील १०७ औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमाचा भाग म्हणून आज मौलाना आझाद सभागृहात शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, स्विप नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, संजीव सोनार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शिक्षक हा व्यवसाय जरी असला तरी ह्या व्यवसायाल प्रतिष्ठा आहे. आपण केवळ शिक्षणाचे काम करीत नाहीत तर एक पिढी घडवित असतात. दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणूका ही आपल्या देशाचे, राज्याचे भवितव्य घडविण्यासाठी योग्य प्रतिनिधींची निवड करण्याची संधी असते. त्यासाठी मतदान हे कर्तव्य बुद्धीने करणे आवश्यक आहे. हे महत्त्व एक शिक्षक चांगल्या पद्धतीने मतदारांना सांगू शकतो. त्यामुळे शिक्षकांनी मतदार जनजागृतीत आपले योगदान द्यावे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
०००००



