
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवाहन
सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जे विद्यार्थी सन 2018-19 ते सन 2023-24 या कालावधीत तांत्रिक अडचणीमुळे व इतर कारणाने भारत सरकार शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या दि. 15 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयान्वये ऑफलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचे आवाहन, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करून महाविद्यालयात जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची असेल. तसेच शासन निर्णयान्वये पात्र ऑफलाईन अर्जाची शासन निर्णयातील नियम, अटी, शर्ती अन्वये छाननी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालयात जमा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची असेल. अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने अंतिम दिनाकांपर्यंत सन 2018-19 ते सन 2023-24 वर्षात ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता आला नाही अशा विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरण्याचे आवाहन श्री. उबाळे यांनी केले आहे



