प्रत्येक ग्राहकाने आपल्या हक्कांप्रती सजग राहणे आवश्यक – डॉ. स्वाती देशमुख – पाटील- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा…
सांगली, प्रतिनिधी आपल्या हक्कांप्रती प्रत्येक ग्राहकाने सजग राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाईन सेवा, उत्पादने घेताना डिजीटली साक्षर होण्याची गरज अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख – पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या मनिषा वनमोरे आणि अर्पिता फणसळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्राहकाच्या भूमिकेतील सामान्य नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे, असे सांगून अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख – पाटील म्हणाल्या, ग्राहकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेले हक्कांची माहिती सामान्य नागरिकांनी घ्यावी. आभासी सुनावणी हे एक चांगले पाऊल असून यातून समस्येचे निराकरण होते. या बाबींची ग्राहक संघटनेशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी जनजागृती करावी. सेवा हक्क अधिनियमांतर्गत शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही सामान्य नागरिकांस सेवा द्याव्यात, आदि बाबी सांगताना त्यांनी दैनंदिन जीवनातील विविध दाखले, उत्पादने यांची उदाहरणे सांगितली. पावतीशिवाय माल खरेदी करताना किंमत व गुणवत्ता तपासून घेणे, तक्रार निवारणासाठी योग्य ठिकाणी दाद मागणे शिकावे, स्वतःची फसवणूक होऊ नये, म्हणून काळजी घेणे याबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
या वर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनासाठी केंद्र शासनाकडून व्हर्च्युएल हिअरींग अँड डिजीटल अक्सेस टू कन्झुमर जस्टिस ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मनिषा वनमोरे यांनी या विषयावर मार्गदर्शन करताना आभासी सुनावणी व ग्राहक सेवेसाठी डिजीटल प्रवेश याबाबतची माहिती सांगून सर्वात जास्त ई फायलिंग तक्रारी झाल्याबद्दल सांगली जिल्ह्याचा गौरव झाल्याचे सांगितले.
ग्राहक संरक्षण कायदा 2019 या विषयावर मार्गदर्शन करताना अर्पिता फणसळकर यांनी कायद्याचे स्वरूप, ग्राहकांचे हक्क आदिंबाबत सांगून ग्राहकांनी सजग राहण्याची गरज व्यक्त केली. तर ऑनलाईन खरेदी सावधानता या विषयावर मार्गदर्शन करताना सर्जेराव सूर्यवंशी यांनी जागो ग्राहक जागो, जागृती आणि जागृती डॅशबोर्ड या ॲपबद्दल माहिती सांगितली. ऑनलाईन खरेदी करताना बाळगावयाची सावधानता स्पष्ट करून फसव्या प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात आशिष बारकुल यांनी ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे विविध हक्क, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आदिंबाबत माहिती सांगून कार्यशाळा आयोजनाचा हेतू विषद केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षक अंजली सुतार यांनी केले. आभार रूपाली सोळंके यांनी मानले.
ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. तसेच ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शनही ठेवण्यात आले होते. या कार्यशाळेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ॲड. मुक्ता दुबे, ग्राहक चळवळीशी संबंधित अनिल ताडे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, संजय कोरे, सर्जेराव पाटील, जनार्दन झेंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.