बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हा रुग्णालय येथील रक्त साठा अल्प प्रमाणात शिल्लक असून रक्त पुरवठा संकलन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालय रक्त केंद्र जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी यांनी केले आहेरक्त केंद्रातून प्रती महिना सरासरी 300 रक्त पिशव्या ह्या निशुल्क रक्त संक्रमणासाठी उपलब्ध केल्या जात आहे. उन्हाळ्यामध्ये रक्त दान शिबिरांचे आयोजन होत नसल्यामुळे रक्त संकलन ठप्प झाले आहे. तसेच या कालावधीत रक्ताची मागणी जास्त असल्याने रक्त केंद्रात अल्प प्रमाणात रक्त पिशव्या शिल्लक आहे. थॅलेसीमिया व सिकल सेल रुग्ण यांना कायमस्वरुपी आणि अपघात झालेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया व इतराना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन होण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.