
मुंबईतील जे जे हॉस्पिटल चे प्रमुख डीन,पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त…
प्रतिनिधी,
मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले. या पदासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी डॉ. लहाने यांनी प्रयत्न केले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबर मंत्रालयात नुकतीच दीर्घकाळ चर्चा झाली. पण देशमुख यांनी डॉ. लहाने यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर त्यांना बुधवारी सेवानिवृत्त करण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली. रुग्णांसाठी धावून जाणारा डॉक्टर अशी तात्याराव लहाने यांची राज्यभर ख्याती आहे. ‘डोळ्याचे डॉक्टर म्हणजे लहाने’ अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.
जे.जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने गेली ३६ वर्षे वैद्यकीय सेवेत रुजू होते. मागील दोन वर्षांपासून ते वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. या पदासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी डॉ. लहाने यांनी मागील काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना संपर्क साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतल्याचे सांगण्यात येते.



