
राज्यात आता पुणे पालिका ‘या’ 23 गावांच्या समावेशामुळे सर्वात मोठी महापालिका…
प्रतिनिधी,: राज्यात सर्वात मोठी महापालिका म्हणून पुण्याचा समावेश झाला आहे. पुणे महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश केल्यानंतर राज्यातील सर्वात मोठी पालिका झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी मागील वर्षांपासून हालचाली सुरु होत्या. त्याला आता मुहूर्तमेढ मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुणे महापालिकेचा विस्तार झाला आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या हद्दीलगतची 34 गावे महापालिकेत समावेश घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यावर कार्यवाही करताना पहिल्या टप्प्यांत 11 गावांचा समावेश झाला. मात्र, उर्वरित गावेही टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्यात येतील, असे शपथपत्र युती सरकारच्या काळात न्यायालयात सादर केले होते.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघडीचे सरकार आले. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्रीपदी म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. अजित पवार यांनी पुढाकार घेत पुणे पालिकेच्या हद्दीत 23 गावे घेण्याचा निर्णय झाला. पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे आता ही गावे पुणे महापालिकेत समाविष्ट होणार आहेत.



