जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी
सांगलीl प्रतिनिधी जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मध्ये शांघाई (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in/ या लिंकवर भेट देवून दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रभारी सहायक आयुक्त दत्तात्रय देवळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होत असते. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील सर्व 23 वर्षांखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा, ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 47 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 63 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार सहभागी झालेले असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने एकूण 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौंसील, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने स्किल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
पात्रता निकष – जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 01 जानेवारी 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry 4.0, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot System Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 01 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणी केलेल्या उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईल, तसेच काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.