शिक्षक दिन कार्यक्रमात नवी मुंबई महापालिका शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
नवी मुंबई प्रतिनिधी- भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीदिन 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने 11 सप्टेंबर रोजी नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता नमुंमपा शाळेतील शिक्षकांचा शिक्षक दिन आगरी कोळी सांस्कृतिक केंद्र, नेरूळ येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षिका, बालवाडी शिक्षिका, मदतनीस बहुसंख्येने उपस्थित होते. ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते शिक्षक व विद्यार्थ्यांचा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्रीमहोदयांनी शिक्षकांनी मांडलेल्या शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाचे अवलोकन करून कौतुक केले.
यावेळी 5 वी आणि 8 वी च्या स्कॉलरशीप परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविले गेले तसेच गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना अध्यापन केलेल्या शिक्षकांचाही गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये प्रथम 3 क्रमांकांचे विद्यार्थी तसेच प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक व शाळा यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. नयना ससाणे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, शिक्षणाधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांनी उपस्थित राहून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये कु. शुभम कनोजिया, नमुंमपा शाळा क्रमांक 18, सानपाडा या विद्यार्थ्याला तामिळनाडू येथील शिक्षण मंत्र्यांकडून विशेष पुरस्कार मिळाला होता, त्यालाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल ना.श्री.गणेश नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी शिक्षकांशी सुसंवाद साधला.
या कार्यक्रमामध्ये शाळा क्रमांक 42, घणसोली यांचे घनसोली पॅटर्न स्कॉलरशीप याबाबत सादरीकरण झाले. शाळा क्रमांक 55, कातकरी पाडा यांचेमार्फत ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ व विविध उपक्रम याबाबत सादरीकरण करण्यात आले. सिंगापूर येथील शिक्षण पद्धतीबाबत शाळा क्रमांक 36 चे शिक्षक श्री. प्रशांत गाडेकर यांनी माहिती दिली. शाळा क्रमांक 31, कोपरखैरणे येथील परसबागेबद्दल सविस्तर सादरीकरण झाले. शिक्षकांचे सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या उत्साहामध्ये पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चार शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.