सिंहस्थ कुंभमेळा; जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा सर्वसमावेशक नियोजन करण्यावर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वेरुळ- घ्रुष्णेश्वर, पैठण या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांवर पर्यटक येण्याची संभावना लक्षात घेता जिल्ह्यात विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.
तथापि, हा आराखडा अधिक व्यापक, सुक्ष्म नियोजन युक्त व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, समाजातील विविध घटक, तज्ज्ञ व्यक्ति यांची मते व माहिती विचारात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करण्यावर संबंधित विभागांनी भर द्यावा. सखोल नियोजन करुन आराखडा फेरसादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज नाशिक येथील कुंभमेळा विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनाची बैठक पार पडली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त लाखो भाविक, पर्यटक, साधुसंत हे महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात जिल्ह्यातील वेरुळ आणि पैठण हे स्थळ महत्त्वाचे आहे. अंदाजे एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील असा अंदाज घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यात प्रामुख्याने परिवहन व वाहतूक व्यवस्था, मुलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचे जतन या महत्त्वाच्या बाबी विचाराधीन करुन सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.
पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या महत्त्वाच्या बाबी,पर्यटकांचा ओघ नाशिक, त्र्यंबकेश्वर कडे असला तरी त्यानिमित्त पर्यटक नजिकच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात छत्रपती संभाजीनगर, शिर्डी ही विमानतळे असल्याने येथे देश- विदेशातील पर्यटक येऊन मग नाशिककडे जातील. या भागातील अजिंठा, वेरुळ, छत्रपती संभाजीनगर , पितळखोरा लेणी, घटोत्कच लेणी, दौलताबाद किल्ला तसेच बिबी का मकबरा, नहेर ए अंबरी, पाणचक्की, जायकवाडी धरण, गौताळा अभयारण्य अशा महत्वाच्या पर्यटक स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल. महाशिवरात्री पर्वात दररोज दीड ते २ लाख पर्यटकांची हजेरी तर सिंहस्थ पर्वात ३ लाख पर्यटकांची दररोज हजेरी अपेक्षित आहे.या सर्व स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे, प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना लागणाऱ्या सुविधांचा विकास करणे, त्यादृष्टीने स्वच्छता, आरोग्य, परिवहन, सुरक्षा इ. सोई विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. याच आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले
आराखड्याची वैशिष्ट्ये-वाहतुक व्यवस्थाः- वाहनतळांसाठी १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग आणि निवास व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात धुळे सोलापूर महामार्ग (समृद्धी महामार्ग लगत), धुळे सोलापूर महामार्ग (कन्नड लगत), खुलताबाद रस्ता (फुलंब्री कडील बाजू), छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग-५२ लगत अशा ठिकाणी ही पार्किंग स्थळे व निवास व्यवस्था निर्माण करण्यात येईल. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, वन वे मार्ग, फेरी बसेस, धार्मिक स्थळांच्या जवळ ई- रिक्षा सेवा, बस स्थानकांवर रियल टाईम डिस्प्ले, आणीबाणीच्या कालावधीतील वाहनांसाठी (अग्निशमन वहने, रुग्णवाहिका, सुरक्षा दलाची वाहने इ.) राखीव मार्ग, डिजीटल वाहतुक व्यवस्थापनासाठी जीपीएस अनुकूल पथदिवे, वाहतुक सिग्नल्स, दिशादर्शक व सुचना फलक, ई. व्हेईकल पार्किंग व चार्जिंग स्टेशन्स इ.भाविकांसाठी मुलभूत सुविधाः- स्वच्छता गृहे, स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छता गृहांची निर्मिती व अस्तित्वात असलेल्या सुविधांची दुरुस्ती, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, आर.ओ. प्लांट, टॅंकर व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, माहिती केंद्र स्थापणे जेथून भाविक-पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल. या शिवाय तीन लाख लोक राहू शकतील अशा क्षमतेची तंबू शिबिरे, धर्मशाळा दुरुस्ती करणे, अशा स्थळांजवळ व तीर्थक्षेत्रांजवळ अन्नक्षेत्र उभारणे हॉटेल व लॉजसाठी सल्लागार सेवा व त्यासाठी क्यू आर कोड बुकिंग सेवा,सुरक्षा व्यवस्थाः- २४ तास निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन द्वारे देखरेख, तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारणे व नियंत्रण कक्ष स्थापित करणे, आपत्ती प्रतिसाद दल स्थापित करणे व अग्निशमन केंद्र, आरोग्य सेवा पथके सज्ज ठेवणे, महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन, महिला पोलिसांची पथके तैनात करणे, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेटींग, सेप्रेशन वॉल्स, सुरक्षा मार्ग इ. व्यवस्था करणे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करणे. त्यात हेलिपॅड उभारणी, विश्रामगृह इ.पर्यटन नियोजनः वेरुळ लेणी व मंदिर सजावट व प्रकाश योजना, दर्शनाचे वेळापत्रक नियोजन करणे, अधिकृत मार्गदर्शन व बहुभाषिक माहिती, स्थानिक तीर्थक्षेत्र व्यवस्थापन, दर्शन वेळापत्रक रियल टाईम उपलब्ध करणे. मोफत वायफाय सुविधा, पर्यटकांसाठी माहितीचे ॲप व पोर्टल्स तयार करणे, क्यू आर कोड व व्हर्च्युअल गाईड सुविधा.स्थानिक विक्रेत्यांना अधिकृत स्टॉल्स उपलब्ध करणे, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, स्थानिकांना रोजगार संधी निर्माण करणे.
कचरा विल्हेवाटीचे नियोजन करा-जी. श्रीकांत,वरील सर्व बाबी लक्षात घेऊन सुविधांचा विकास करावयाचा आहे. यासंदर्भात आज बैठकीत चर्चा झाली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, पर्यटकांना पार्किंग, निवास,स्वच्छता गृहे, आहा गृहे इ. बाबत सर्वंकष माहिती असणारी मोबाईल ॲप सुरु करावे. तसेच निर्माण होणारा कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पद्धतीने लगेचच करता यावी यासाठीची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरते निवारे हवेत- पोलीस अधीक्षक डॉ. राठोड,पोलीस अधीक्षक डॉ. राठोड म्हणाले की, पर्वणी कालावधीत बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना तात्पुरती निवासस्थाने उपलब्ध करुन द्यावी लागतील. तसेच संदेशवहन उपकरणे, वाहने इ. व्यवस्था निर्माण करावी लागेल.सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा- जिल्हाधिकारी स्वामी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, आरोग्य व्यवस्था, भाविकांची व महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ/ दिव्यांग यांना दर्शनासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करणे, रस्त्यांवरील अपघात प्रवण स्थळे दूर करणे, रस्ते सुरक्षा उपाययोजना राबविणे, सौर उर्जेचा अधिकाधिक वापर करणे (पथदिवे, प्रकाश व्यवस्था इ.) याबाबींचा या आराखड्यात समावेश करावा. तसेच या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवासी, विक्रेते, तज्ज्ञ, अभ्यासक यांचे म्हणणे विचारात घेऊन अंतिम प्रस्ताव लवकरात लवकर तयार करावा. आराखडा हा सर्वसमावेशक होण्याच्यादृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे,असे निर्देश त्यांनी दिले.