
नव्या भारताच्या निर्माणासाठीे या धोरणाचा संशोधकांनी अभ्यास करून त्या दिशेने वाटचाल करावी,
भगवंत सिंग,कोशीयारी (राज्यपाल) महाराष्ट्र राज्य
नांदेड प्रतिनिधी : आज शिक्षणामध्ये नवे तंत्रज्ञान कितीही वाढले तरी ते अधिक चांगले करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. देशात मातृभाषेतून इंजिनिअरिंग सुरू होणे ही आश्वासक बाब आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेविषयीचा अभिमान जागा होईल. विद्यार्थ्यामध्ये समर्पणाची भावना निर्माण करण्यासाठी मातृभूमी, मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा, असे मत राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सभागृहात बोलत होते. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन व्यासपीठावर होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, नवे शैक्षणिक धोरण हे नव्या भारताच्या निर्माणासाठी आहे. या धोरणाचा प्राध्यापक व संशोधकांनी अभ्यास करून त्या दिशेने वाटचाल करावी. येणाऱ्या काळात स्टार्टअप, स्वयंरोजगार याविषयी विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करावे. दरम्यान, कोश्यारी यांनी विद्यापीठ परिसरात निर्माणाधीन असणाऱ्या गुरुगोविंदसिंग अध्यासन संकुल, संशोधन केंद्राच्या इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. विद्यापीठ परिसरातील जलसिंचन, जल पुनर्भरणासाठी बनवलेल्या तलावांची प्रशंसा केली. यावेळी त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण झाले. दरम्यान, विद्यापीठातील अल्पसंख्याक मुले व मुलींच्या वसतिगृहांच्या उद्घाटनासाठी ते दौऱ्यावर आले होते. परंतु, दोन्ही इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून त्यांनी फक्त पाहणी केली.
लोकांत मिसळायला आवडते-छत्रपती शिवाजी महाराज, श्री गुरु गोविंदसिंगजी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे महापुरुष माझ्यासाठी राम, कृष्ण या दैवताप्रमाणे आहेत. सद्यःस्थितीत सर्वच महापुरुषांच्या कार्याचा विसर पडत चालला आहे, हे दुर्दैव आहे, अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली. मला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडते. लोकांत मिसळल्यावरच अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. कोरोनामुळे दोन वर्षांत कुठे जाता आले नाही. राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे.



