vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

व्हिंटेज ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण

व्हिंटेज ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण..

मुंबई प्रतिनिधी- ऐतिहासिक वारसा लाभलेले १९३७ मधील ‘टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन’ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल होत आहे ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे ‘टर्न टेबल शिडी’ अग्निशमन वाहना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उद्योजक गौतम सिंघानिया व मान्यवर उपस्थित होते.सन १९३७ मध्ये निर्मित आणि सन १९४४ मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन (Restoration) करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या व्हिंटेज अग्निशमन सेवा वाहनाची औत्सुक्याने पाहणी करुन या वाहनाच्या जतन व संवर्धनाबद्दल गौरवोद्गार काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई अग्निशमन दल देशातच नव्हे तर जगातही सर्वात कार्यक्षम अग्निशमन सेवा दल आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळोवेळी बलिदान देऊन नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. या ऐतिहासिक वाहनाच्या मदतीने अनेक अग्निशमन मोहीमा पार पाडल्या. आज हे वाहन नव्या स्वरूपात दाखल होत आहे ही बाब बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासाठी तसेच मुंबईकरांसाठीही गौरवास्पद आहे. अशा जुन्या व ऐतिहासिक विविध वारशांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सन 1937 मध्ये निर्मित ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी वाहना’चे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची सन १९३७ मध्ये इंग्लंडमधील लेलँड (Leyland) कंपनीत निर्मिती करण्यात आली. तर, दि. २४ सप्टेंबर १९४१ रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आले. तत्कालिन उंच इमारती, गोदामे तसेच बंदर परिसरातील उंच भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णत: लोखंडी संरचनेत तयार करण्यात आली होती. ती हाताने, साध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची.

दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात (मुंबई डॉक) उभ्या असलेल्या एस. एस. फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजाला आग लागली होती. दारुगोळा, स्फोटके, इंधन आणि युद्धसामग्रीने हे जहाज भरलेले होते. त्यामुळे, जहाजावरील आगीने रौद्ररूप धारण केले. अशा भीषण परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेतले. बंदरावरील उंच गोदामांतील आग विझवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणे, जहाजाच्या आसपास अडकलेल्यांना वाचवणे तसेच जखमींना खाली उतरवणे आदी शर्थीची कामे या वाहनाच्या मदतीने अविरत सुरू होती. या दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले. मात्र, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राणही वाचले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या संकल्पनेतून, उद्योजक गौतम सिंघानिया यांच्या सहकार्याने वाहनाला नवी झळाळी

‘टर्न टेबल शिडी’ असलेले हे वाहन कालांतराने नादुरुस्त झाले आणि त्यास स्मृतिरुपात मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयी म्हणजेच भायखळा अग्निशमन केंद्रात जतन करुन ठेवण्यात आले. दरम्यान, या वाहनाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी त्याचे पुनर्जतन करण्याची संकल्पना मांडली. प्रसिद्ध उद्योजक गौतम सिंघानिया यांच्या सहकार्यातून या वाहनाला नवी झळाळी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जे. के. इन्व्हेस्टर बॉम्बे लिमिटेड या कंपनीने सुपर कार क्लब गॅरेजमध्ये या वाहनाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.

अनेक दशकांपासून बंद असलेले हे वाहन पुन्हा सुरू करणे, वाहनाची झिजलेली यंत्रणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या वाहनाचे मूळ सुटे भाग (स्पेअर पार्टस्) मिळवणे अत्यंत जिकरीचे कार्य होते. वाहनाची बनावट खूप जुनी असल्याने त्याचे सुटे भाग उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी तत्कालिन तांत्रिक नोंदी, आराखडे आणि संदर्भ शोधण्यात आले. त्यानुसार, प्रत्येक सुट्या भागाची संरचना (डिझाइन) तयार करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सुटे भाग नव्याने बनविण्यात आले.

आता हे वाहन अग्निशमन सेवेसाठी सज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांची संकल्पना, उद्योजक गौतम सिंघानिया यांचे सहकार्य आणि या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अभियंत्यांची संशोधकता व कल्पकतेच्या बळावर मुंबई अग्निशमन दलाच्या या ऐतिहासिक वाहनास नवी झळाळी मिळाली आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

किशोरवयीन मुलांच्या व्यसन परावृत्तीसाठीज्ञानप्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण..- प्रबोधनाचे मॉड्युल यशस्वी करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश- नोव्हेंबर महिन्यातील चार रविवारी चालणार प्रशिक्षण सत्र

vishwatmaklokswamivarta

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके …