vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुष्ठरोग निवारण दिन-भेदभाव समाप्त करु या, सन्मानाची वागणुक देऊ या

कुष्ठरोग निवारण दिन-भेदभाव समाप्त करु या, सन्मानाची वागणुक देऊ या

 आरोग्य प्रतिनिधी-  सन 1873 मध्ये डॉ.हॅन्सन यांनी कुष्ठ रोगाच्या जंतुचा शोध लावला. त्यामुळे कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असे सुध्दा म्हणतात. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जिवाणु पासुन होतो. दरवर्षी 30 जानेवारीला कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यांत येतो. या दिवशी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. महात्मा गांधी यांनी कुष्ठरुग्णांची सेवा करुन काळजी घेतली आहे. या आजारावर मात करण्यासाठी जागरुकता वाढविण्यात येऊन जनजागृती करण्यांत येते. जनतेमध्ये जनजागृती करुन समाजातील कुष्ठरोगाचे निर्मुलन करणे तसेच केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत कुष्ठरोग प्रसाराचे प्रमाण शुन्य करण्याचे हे उदिद् ष्ट आहे. कुष्ठरोगाचा प्रसार थांबविणे व कुष्ठबाधित रुग्णांना लवकरात लवकर बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांना (निकट सहवासित) रिफॅम्पिसीन या गोळीचा एकल डोस देऊन संसर्गापासुन सुरक्षित करणे हे प्रमुख उदिद् ष्ट आहे.

घोषवाक्य : ’ भेदभाव समाप्त करु या, सन्मानाची वागणुक देऊ या ’

लक्षणे :- त्वचेवर लालसर फिकट न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा, तेलकट त्वचा, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळया जाड होणे, त्वचेला थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाता पायाची बोटे वाकडी, मज्जातंतु जाड होणे.

प्रसार :- कुष्ठबाधित रुग्णांच्या खोकला/शिंकाद्वारे मायकोबॅक्टेरियम लेप्री जिवाणु हवेमध्ये पसरतात. श्वसनप्रक्रिया मध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये मायकोबॅक्टेरियम लेप्री जिवाणु प्रविष्ठ होतात. दुषित हवेद्वारे कुष्ठरोगाचा प्रसार होतो. कुष्ठरोग बाधित व्यक्ती सोबत जवळचा संपर्क असल्यास त्याचा प्रसार होतो. कुष्ठरोगाविरुध्द लढण्याच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीमुळे बहुतांश लोकांना (98 टक्के) कुष्ठरोग होत नाही. कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो.

अधिशयन काळ : 6 महिने ते 10 वर्षे.,रोगनिदान :- बाहय शारीरिक तपासणी उदा. त्वचेवर लालसर फिकट न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा तपासणी, कानाच्या पाळया जाड, भुवयांचे केस विरळ, हाता पायाची बोटे वाकडी पाहणी, बायोप्सी,

प्रकार :- कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत 1) पी.बी.(पॉलीबॅसिलाय) व 2) एम.बी.(मल्टीपल बॅसिलाय).औषधोपचार :- सर्व शासकिय रुग्णालयात रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. एम.डी.टी.औषधोपचार पध्दती आहे. पी.बी.केस मध्ये 6 महिने औषधोपचार दिला जातो. यामध्ये टॅब.डापसोन, रिफामायसिन दिल्या जातात. पी.बी.केस असंसर्गजन्य आहे. एम.बी.केस मध्ये 12 महिने औषधी दिली जाते. यामध्ये टॅब.डापसोन, रिफामायसिन व क्लोफायझीमीन दिल्या जातात. एम.बी.केस संसर्गजन्य आहे. पी.बी.केस मध्ये 1 ते 5चट्टे व एम.बी.केसमध्ये असंख्य चट्टे असतात.       कुष्ठरोगामुळे अंधत्व, किडनीविकार, स्नायु कमकवुत, कायमचे हाताचे/पायाचे बोटे नष्ट होते, मज्जातंतुचे नुकसान होते, चेहरा विकृतीग्रस्त होतो.गैरसमज :- कुष्ठरोग अनुवांशिक नाही. कुष्ठरोग हा शाप नसुन जिवाणुमुळे होणार रोग आहे.सामाजिक घटक :- गरीबी, वैयक्तीक अस्वचछता, गर्दी.

प्रतिबंध :- बी.सी.जी. लस घेतल्यामुळे 50 टक्के कुष्ठरोगापासुन संरक्षण मिळते. आरोग्यदायक वातावरण ठेवणे, विटामीन अे,सी,डी,इ, बी-12 व खनिज झिंक, मॅग्नेशियम व शिलेनियम चे प्रमाण व्यवस्थित ठेवणे. कुष्ठबाधित व्यक्तीचे लवकरात लवकर निदान करुन एम.डी.टी.औषधोपचाराखाली आणणे. एम.डी.टी.औषधोपचार प्रणालीमुळे कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो.

पुर्नेवसन :- कुष्ठरुग्णांचे वैद्यकिय, आर्थिक व सामाजिक पुर्नेवसन होणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या कुष्ठ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व ठराविक स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया मोफत करण्यांत येतात. मेजर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना रुपये 12000/- इतका प्रोत्साहनपर भत्ता तसेच मेजर शस्त्रक्रिया करणा-या शासकिय आरोग्य संस्थांना रुपये 5000/- इतका प्रोत्साहनपर भत्ता देण्यांत येतो.कुष्ठरुग्णांच्या पायाला नवीन जखम होऊ नये किंवा जखमा असलेल्या रुग्णांना वर्षातुन दोन वेळा मोफत एम.सी.आर.चप्पल देण्यांत येते. कुष्ठरुग्णांना हाताची बोटे वाकडी असतील तर रुग्णांना मोफत स्प्लिंटस. पात्र कुष्ठरुग्णांना सर्व शासकिय रुग्णालये व स्वयंभु कुष्ठ वसाहतीमध्ये गरजेप्रमाणे मोफत व्रणोपचार सेवा व भौतिकोपचार सेवा देण्यांत येतात. कुष्ठरुग्णाला शासन मार्फत विविध सुविधा देण्यांत येतात. उदा.एस.टी.बस मध्ये प्रवास सवलत, कुष्ठमुळे अंपगत्व असल्यास अंपगाचे प्रमाणपत्र. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.

आकडेवारी: माहे एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 अखेरपर्यंत एकूण 143 नवीन कुष्ठरुगण आढळून आले असून त्यांना बहुविध औषध सुरू करण्यात आले आहेत तसेच कुष्ठरोगोनांच्या संपर्कातील नातेवाईकांना (सहवासीतांना) रिफामायसिन या गोळीचा एक डोस देऊन संसर्गापासून सुरक्षित करण्यात आले आहे.

(डॉ. जयश्री भुसारे) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना

संबंधित पोस्ट

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

vishwatmaklokswamivarta

कफ सिरपची गुणवत्ता आणि तर्कशुद्ध वापरासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांची राज्यांसोबत उच्च-स्तरीय बैठक

एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन

जागतिक आरोग्य दिनी विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा-२०२५ चे आयोजन

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..