vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

बुलढाणा (प्रतिनिधी),दैनंदिन जीवनात वाढते ताण-तणाव व मोबाईल तसेच समाज माध्यमांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे विविध खेळ व संस्कृती लोप पावत आहेत. अशा वेळी आपल्या मातीशी नाळ घट्ट जुळलेली राहावी म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात बुलढाणा शहराची क्रीडा क्षेत्रात नवी ओळख निर्माण होईल व नाव लौकिक वाढेल यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, इंडोर स्टेडियम व जलतरण तलाव उभारला जाणार असल्याची माहिती सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी याप्रसंगी दिली.

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी कर्मचारी यांच्या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ आज आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पाडला. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात हे होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या सुविद्य पत्नी सौ. रिपिका खरात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड. राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त नवलकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयोजन समितीचे सदस्य सचिव आशिष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, सतीश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने, कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंडोगडे,सर्व पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व विविध खातेप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, प्रशासकीय कामकाज करताना निर्माण होणारे ताणतणाव लक्षात घेता त्यामधून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाला विविध छंद जोपासणे आवश्यक आहे. सुदृढ शरीर व सशक्त मनासाठी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा तसेच क्रीडा क्षमतांचा विकास गरजेचा आहे. त्या दृष्टीने ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेसारख्या भव्य यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित होणाऱ्या ह्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा निश्चितच उपयुक्त आहेत. या तीन दिवसीय उपक्रमाचा सर्वांनी आनंद घेऊन नव्या जोमाने जनसेवेत रुजू व्हावे. यासाठी सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी सर्व सहभागी अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रकारातील विविध सामने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत होणारे विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या पंचांनी सुद्धा भानगडी न करता वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून यथोचित स्पर्धकांना न्याय द्यावा, अशी कोपरखळी सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

आपल्या समयोचित अध्यक्षीय मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी खेळाडूंना देण्यात आलेल्या शपथेचा संदर्भ देऊन शिस्त व सभ्यतापूर्वक हा तीन दिवसीय स्पर्धांचा कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे स्वतः क्रीडापटू असल्याने व त्यांनी ठोसपणे क्रीडा विकासासाठी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे घोषित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

आपल्या प्रास्ताविक पर भाषणात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयोजन समितीचे सचिव आशिष पवार यांनी दिनांक 4 ते 6 फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या होत असलेल्या आयोजना बाबतची पार्श्वभूमी विशद केली.

उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी महाराष्ट्र गीत गायन केले.

आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात व मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण, क्रीडा ज्योत प्रज्वलन करून सर्व खेळाडूंना शपथ देण्यात आली. यावेळी संगीतमय वातावरणात व आकाशात विविध रंगी फुगे सोडून स्पर्धांचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले.

 

 

संबंधित पोस्ट

महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी 

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श #आचारसंहिता लागू,