vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिर्डी परिक्रमेसाठी भाविकांच्या सुरक्षेला व आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्या – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर-डीजे व फिरती साऊंड सिस्टीम (बॅन्ड) वापरण्यास मनाई…

शिर्डी परिक्रमेसाठी भाविकांच्या सुरक्षेला व आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्या – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर-डीजे व फिरती साऊंड सिस्टीम (बॅन्ड) वापरण्यास मनाई…

 

शिर्डी, प्रतिनिधी आगामी १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी साई परिक्रमेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. भाविकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य व स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत परिक्रमा मार्गावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी परिक्रमेदरम्यान डीजे व फिरत्या साऊंड सिस्टीमवर कडक निर्बंध असून केवळ निश्चित ठिकाणी स्थिर स्वरूपात भजन व पारंपरिक वाद्य वादनास परवानगी द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

शिर्डी परिक्रमा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, किरण सावंत पाटील, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तहसीलदार अमोल मोरे, साई संस्थान प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

श्री. कोळेकर म्हणाले, परिक्रमा मार्गावर अन्नदान करणाऱ्या स्टॉलधारकांनी कचरा व्यवस्थापनाचे काटेकोर पालन करावे. कचरा संकलनासाठी डस्टबिन व मोठ्या ड्रमची व्यवस्था करून प्लास्टिक बाटल्या व कचरा तत्परतेने जमा करावा. नगरपालिकेने परिक्रमा मार्गावरील रस्ते, स्वच्छता व पथदिव्यांची दुरुस्ती वेगाने पूर्ण करावी, तसेच सेंट लॉर्न हॉटेल ते एसटीपी मार्गावरील अरुंद रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकून सपाटीकरण करावे.

महावितरणने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची उंची वाढवावी, अंधार असलेल्या भागात हॅलोजन दिवे लावावेत व आवश्यक तेथे कर्मचारी नियुक्त करावेत.

भाविकांच्या आरोग्यासाठी परिक्रमा मार्गावर १० रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके व ओआरएस केंद्रे तैनात ठेवावीत. महिला भाविकांची कुचंबणा होऊ नये यासाठी मार्गावर ठिकठिकाणी फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी व ती राखीव ठेवावीत. १२ तारखेला वाहतूक बंदी लागू होण्यापूर्वीच पाण्याचे टँकर व पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा. साकोरी शिवारातील वीटभट्ट्या व स्टोन क्रशरमुळे होणारी धूळ व चिखल टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी परिक्रमेच्या दोन-तीन दिवस आधी कामकाज व वाहतूक बंद ठेवावी. तसेच परिक्रमा मार्गक्रमण झाल्यानंतर त्वरित साफसफाई करण्यासाठी विशेष पथके व घंटागाड्यांची सोय करावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक पर्यायी रिंग रोडने वळविण्याचे नियोजन करावे. भाविकांच्या वाहनांसाठी संस्थानच्या व खासगी मोकळ्या जागांवर विनामूल्य पार्किंग उपलब्ध करून दिशादर्शक फलक लावावेत.

रस्त्याच्या कडेला असलेल्या रक्षक दगडांवर रिफ्लेक्टर बसवावेत. पोलीस प्रशासनाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने १२ तारखेला मद्यविक्री बंद (ड्राय डे) पाळण्याबाबत दक्षता घ्यावी, असेही श्री.कोळेकर यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींनी स्वागत कमानींऐवजी स्वागत मंच उभारावेत. भविष्यातील नियोजनासाठी नगररचना विभागाने परिक्रमा मार्गाचे ३० मीटर रुंदीकरण करण्यासाठी मोजणी करावी व गर्दीचा ताण कमी करण्यासाठी परिक्रमेचा प्रारंभ बिंदू महामार्गाऐवजी पश्चिम बाजूस नेण्याबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचनाही श्री. कोळेकर यांनी दिल्या.

श्री.गाडीलकर म्हणाले, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी खंडोबा मंदिर परिसरात मोठी एलईडी स्क्रीन उभारावी व आरतीनंतर सकाळी ५:४० वाजता रथाचे प्रस्थान होईल याचे नियोजन करावे. कृषी विभागाने शासकीय योजनांचे प्रसिद्धी फलक सुरक्षितरीत्या लावावेत.

यावेळी ग्रीन अण्ड क्लीन शिर्डी फौंडेशनचे अजित पारख यांनी शिर्डी परिक्रमा आराखड्याचे सादरीकरण केले. भविष्यातील परिक्रमा मार्ग कसा असावा, याचे संकल्पचित्र स्पष्ट करणारी ध्वनिचित्रफीत यावेळी सादर करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

बँकांनी शासकीय योजनांसाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन**नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान…

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ,खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा ; दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta