
दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या..
कणकवली प्रतिनिधी : परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज येथे दिले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले असून ते आता गायब केले आहेत अशीही टीकाही त्यांनी केली. प्रहार भवनमध्ये किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सीआरझेडचे (CRZ) उल्लंघन करून दापोली समुद्र किनारी दोन बंगले बांधले. यातील एक रिसॉर्ट १७ हजार स्क्वेअर फुटाचे आहे. दुसर्या बंगल्याचा तपशील अजून यायचा आहे. समुद्रपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हे बांधकाम असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत पाडावेच लागणार आहे. मिलिंद नार्वेकर यांना आपले बांधकाम तोडावे लागले. त्याच धर्तीवर परब यांनाही आपले बांधकाम तोडावेच लागणार आहे. मुख्यमंत्री यांनी ते बांधकाम वाचून दाखवावे. त्यांना माझे खुले आव्हान आहे.



