
आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर; प्रतिनिधी जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने झोकूण देऊन काम करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.
मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज येथे विभागातील, १३जिल्ह्यातील जिल्हा स्तरावरील,पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता आयोजित ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट होते. तसेच अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, छत्रपती संभाजी महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त (शहरी आरोग्य) डॉ. सुनील भोकरे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीन्नू पी.एम,आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, तसेच आरोग्य सेवा संचालक (प्राथमिक)डॉ. विजय कंदेवाड व्यासपिठावर उपस्थित होते.
श्री. आबीटकर म्हणाले, आरोग्य विभागामार्फत गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ यांनी स्वागत करीत बैठकीत अभियानाला मंजूरी दिली. प्रत्येक लोकप्रतिनिधींनीही आपल्या मतदार संघात विकास कामांबरोबर जबाबदारीने मतदार संघाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिल्हा पातळीवर सर्वाना विश्वासात घेऊन ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानात पुढे जावे. जिल्हा , तालुका,तसेच गाव पातळीवरील सर्व समित्यांची स्थापना करून त्यासंबंधीतांना प्रशिक्षित करावे. आजाराच्या सुरवातीच्या टप्यात निदान करण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे. कॅन्सर, बीपी, शुगर आणि इतर आजारांची वेळीच तपासणीसाठी आशा सेविका, आरोग्य अधिकारी या यंत्रणांनी घरोघरी पोहचणे आवश्यक आहे.
कोणीही आजारीच पडूच नये यासाठीचे उपाय संत तुकडोजी महाराजांनी आधीच लिहून ठेवलेले आहे त्याचा अवलंब आपल्या जीवनात करायचा आहे, असे श्री.आबिटकर यावेळी म्हणाले.
हे अभियान शासकीय न राहता यामध्ये ज्यांना जी जबाबदारी दिली आहे त्यासाठी त्यांनी जबाबदारीने काम करायचे आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने काम करायचे आहे. प्रत्येक नागरिकांने शासकीय रूग्णालयात उपचार घेतले पाहिजे यासाठी सगळ्या सेवा चांगल्या पध्दतीने लोकांपर्यत पोहचल्या पाहिजे. कोरोना काळामध्ये सरकारी दवाखा सर्वांसाठी आधार होता त्यापेक्षा अधिक उत्कृष्ट काम या अभियानात सर्वांनी लोकसहभागाच्या माध्यमातून करायचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या सुचनांनुसार लवकरच आरोग्य विभागात पदभर्ती करण्यात येणार आहे तसेच रूग्णालय सुरू करण्यासाठी आवश्य निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणातील रूग्ण छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी येतात. त्याप्रमाणात मोठ्या रूगणालयांचे विशेषत: महिला व शिशू रुग्णालयाची इमारती उभ्या राहिल्या परंतू काही कारणास्तव रूग्णालये अजून सुरू झाले नसल्याने रूग्णालये लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना केली.
आमदार डॉ. लहामटे ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबवित असल्याबाबत शासनाचे आभार मानले. प्रत्येक नागरिकांनी आरोग्य संपन्न होण्यासाठी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, आपले गाव आरोग्य संपन्न होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार श्री.बोरनारे यांनी ग्रामीण भागात कॅन्सर रूग्णांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त त्यावर उपाय योजना करण्याच्या सुचना केली. त्याच बरोबर शासकीय रूग्णालयात चांगले उपचार केले जातात त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांनी शासकीय रूग्णालयात उपचार घ्यावे, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी ग्रामीण भागातील आरोग्य विषयक विविधबाबीची माहिती देत आरोग्य विभागात आवश्यक बाबीची उपलब्धता करून देण्याबाबत विविध सुचना केल्या.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भंडारी म्हणाले, चांगल्या आरोग्याची सुरवात शुध्द पाण्यापासून सुरू होते. त्यामुळे गावांतील स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्राणांचे सहयोग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. विनायक निपुण यांनी ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाविषयी माहिती देत म्हणाले की, आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नव्हे तर सार्वजनिक बाब आहे, त्यामुळे लोकसभागातून गाव आरोग्य संपन्न बनवायचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून माता-बाल स्वाथ्य सुधारणे, साथ रोगाला टाळणे ते रोखण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे आणि बीपी, शुगर व इतर आजाराचे वाढणारे प्रमाण वेळीच रोखण्यासाठी उपाय योजना करणे हे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी सर्वांनी समन्वयाने घरोघरी जाऊन तपासणी करून आपले गाव आरोग्य संपन्न गाव करायचे आहे. त्यासोबतच येत्या काळात हे अभियान शहरी भागात राबविण्यात येईल, असेही डॉ. विनायक म्हणाले.
या कार्यशाळेला छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक परिमंडळातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या 13 जिल्ह्यातील उपसंचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी ,जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. तसेच “माझं गांव, आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
**



