‘१९६२ कॉल सेंटर’ व मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध
रायगड अलिबाग, प्रतिनिधी पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. ‘१९६२ कॉल सेंटर’ आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणजे, यापैकी ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील पशुपालकांसाठी ही सेवा ‘लाईफलाईन’ ठरली असून, तब्बल ३४,९७९ पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. हे केवळ आकडे नसून, पशुसंवर्धन क्षेत्रातील समर्पित पशुवैद्यकीय सेवेचे निदर्शक आहे.
अपघात, विषबाधा किंवा कठीण प्रसूती अशा आपत्कालीन स्थितीत ‘गोल्डन अवर’ (पहिली महत्त्वाची घटका) मध्ये उपचार मिळणे अनिवार्य असते. कॉल आल्यानंतर अवघ्या १.५ तासात पशुवैद्यकीय पथक प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचते. या तत्परतेमुळे एकूण ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचले आहेत. यामध्ये २९,१३० मोठे पशुधन व ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे. पशुवैद्यकीय शास्त्रात ‘गोल्डन अवर’ मधील उपचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या काळात मिळालेले उपचार पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करतात.
पूर्वी किरकोळ आजारासाठीही पशुधनाला दवाखान्यात नेणे जिकिरीचे व महागडे ठरत असे, परंतु आता तज्ज्ञ पशुवैद्यक स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. यामुळे केवळ आजार बरे होत नाहीत, तर वेळेवर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही सुलभ झाले आहे. परिणामी, दुग्धव्यवसाय हा केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक शाश्वत व फायदेशीर व्यवसाय म्हणून आकारास येत आहे. शेतकऱ्यांमधून या सेवेबाबत समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
१९६२ हेल्पलाईनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा :-औषधोपचार: आजारी जनावरांवर तातडीने उपचार.शस्त्रक्रिया: छोट्या व मोठ्या शस्त्रक्रियांची सुविधा.खच्चीकरण: शास्त्रीय पद्धतीने खच्चीकरण सेवा.कृत्रिम रेतन: पशुपैदास सुधारणेसाठी कृत्रिम रेतन.जंतनाशक उपाययोजना: जनावरांच्या पोटातील जंतांवर नियंत्रण.लसीकरण: विविध साथरोगांपासून बचावासाठी लसीकरण.मार्गदर्शन: पशुआरोग्य व योग्य आहार व्यवस्थापन सल्ला.वंध्यत्व तपासणी: जनावरांमधील वंध्यत्व तपासणी व निर्मुलन.अपघात सेवा: नैसर्गिक आपत्तीत सहाय्य, भाजणे, सर्पदंश, व इतर सर्व आपत्कालीन समस्यांबाबत तात्काळ प्रतिसाद व उपचार.योजनांची माहिती: पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजना.व्हॉटसअप चॅटबॉट: चॅटबॉटद्वारे सहज माहिती मिळवण्याची सुविधा.
तंत्रज्ञानाची जोड व भविष्यातील वाटचाल:कॉल सेंटरमध्ये वापरले जाणारे अद्ययावत सॉफ्टवेअर, कॉल रेकॉर्डिंग व फीडबॅक सिस्टीम यामुळे सेवेचा दर्जा सुधारला आहे. आगामी काळात ही सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित प्राथमिक सल्ला व व्हॉट्सॲप चॅटबॉट यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे नियोजन आहे. या प्रगत प्रणालीमुळे प्रत्येक कॉलचे अचूक ट्रॅकिंग व पशुवैद्यकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे सुलभ होणार आहे. रुरल कनेक्टिव्हिटी व डेटा ॲनालिटिक्सच्या जोडीने, दुर्गम भागातील पशुवैद्यकीय गरजांचे विश्लेषण करुन आवश्यक कार्यवाही नियोजनपूर्वक करता येईल. प्रस्तावित एआय तंत्रज्ञानामुळे पशुपालकांना तातडीच्या परिस्थितीत प्रथमोपचार व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती काही सेकंदात उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. डिजिटल क्रांतीची ही जोड पशुवैद्यकीय सेवांच्या कार्यक्षमतेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरेल, ज्यामुळे पशुधनाची हानी कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल.
१९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा :- वर्षभरात ४,०१,९९२ कॉल्स, ३.७८ लाख तक्रारींचे निवारण,दुर्गम भागातील ३४९७९ पशुपालकांना लाभ, ‘गोल्डन अवर’ मधून ६४७५९ पशुधनाला जीवदान .