vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

राज्य प्रतिनिधी

नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले तर देशाचे भविष्य उज्ज्वल राहील; यादृष्टीने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाला नेहमीच बळ दिले आहे, त्यामुळे प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्यावतीने बारामती तालुक्यातील होळ येथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले तसेच यावेळी जिल्ह्यातील ४४ मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, राज्याचे दिवंगत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेने साकारलेल्या विविध लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण योजना आज संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘नासा-इस्रो भेट योजना’, ‘एकलमाता कल्याण योजनां’ सारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची नोंद इतर राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतली आहे, त्या संस्था आज आपल्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधत आहेत, हे आपल्या कामाचे यश आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा परिषदेने आज एकाच वेळी, एकाच दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते ४४ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे अत्यंत साध्यापद्धतीने दूरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्याचे नियोजन केले, त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे, ही बाब स्तुत्य असून अनुकरणीय आहे.बारामतीला ‘गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त तालुका’ करण्याचा आपला निर्धार

विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’च्या माध्यमातून ‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री बारामती फॉर मदर्स अँड डॉटर्स’ या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला असू ही केवळ आरोग्य मोहिम नसून माता-भगिनींच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीचा व्यापक पाया आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातल्या ३० ते ६५ वयोगटातील प्रत्येक महिलांची मोफत एचपीव्ही डीएनए तपासणी आणि ९ ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक आई आणि मुलीला कॅन्सर विरोधी संरक्षण कवच देण्याचे ध्येय ठेवले आहे. आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम गावागावात राबविला जाणार आहे. बारामतीला ‘गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त तालुका’ करण्याचा निर्धार आहे. नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी

प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून याच विचारातून “मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र” ही संकल्पना पुढे आली आहे. पुणे जिल्हा हा आरोग्य सुविधांच्यादृष्टीने राज्यामध्ये नेहमीच आघाडीवर राहिला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात व्यापक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. मात्र बदलत्या काळानुसार ग्रामीण आरोग्य व्यवस्थाही आधुनिक आणि सक्षम होणे आवश्यक होते. त्यासाठीच ‘मॉडेल पीएचसी’ ही संकल्पना पुढे आली.ग्रामीण नागरिकांना शहरासमान दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध,मॉडेल पीएचसीचे केंद्र हे आधुनिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कुशल कर्मचारी, मातृत्व व बाल आरोग्य सेवा, रोग प्रतिबंध, जनजागृती आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असलेले सर्वसमावेशक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डिजिटल हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, सुसज्ज प्रसूती गृह, स्वच्छ आणि रुग्णाभिमुख वातावरण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरासमान दर्जाची आरोग्य सेवा आता आपल्या गावातच मिळणार आहे.

आज पुणे जिल्ह्यात ११० पैकी ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रे मॉडेल पीएचसी प्रक्रियेत आहेत. त्यापैकी १९ केंद्रांचे अत्याधुनिक नूतनीकरण पूर्ण झाले असून ती पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ७ केंद्रांची कामे प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्ण होतील. २९ केंद्रांमध्ये प्रसूतीगृह आणि शस्त्रक्रिया विभागांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कामामध्ये ‘सीएसआर’च्या माध्यमातून अनेक संस्थांनी मोलाचे योगदान दिलं आहे. ‘बॉश इंडिया’ने आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधी उपलब्ध करून देत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, प्रसूती गृह आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहे. भारत फोर्ज उद्योगसमूहाने होळ मॉडेल ‘पीएचसी’साठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी लक्षात घेता जिल्हा परिषदेने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. ही आरोग्य चळवळ अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात पुढे नेण्याची गरज आहे. होळ, मोरगाव आणि जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या विविध ठिकाणी मॉडेल पीएचसी सेंटर उभारल्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी शहरात जाण्याची गरज कमी होईल. पण ही केंद्रे उभारणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती सक्रिय ठेवणे आणि त्यांचा योग्य वापर करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहेदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी अत्यंत महत्त्वाची पावले उचलली होती. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पनाही त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे आली आहे. आरोग्य हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कोरोनाच्या अत्यंत कठीण काळातही त्यांनी राज्याची अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था दोन्ही सक्षमपणे सांभाळली. त्या काळात पुणे जिल्ह्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत त्यांनी समन्वयासाठी नियमित बैठका घेतल्या. आरोग्य यंत्रणेला बळ दिलं. आणि प्रत्येक नागरिकाला उपचार मिळावेत यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शासकीय नर्सिंग कॉलेज उभे राहिले. लवकरच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या भव्य आणि अत्याधुनिक नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. देशातील सर्वात सुंदर आणि आधुनिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलांपैकी एक म्हणून ते ओळखले जाईल. याचबरोबर बारामतीमध्ये अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मॉडेल राज्यात राबविणार -सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री,श्री. आबिटकर म्हणाले, केरळ राज्याच्या धर्तीवर राज्यातही आरोग्य सुविधा उभारण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले, त्यानुसार आज पुणे जिल्ह्यातील होळ येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सार्वजनिक आरोग्य विभागाला नवीन दिशा देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून झाले आहे. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मॉडेल राज्यात राबविण्याचा त्यांनी संकल्प केला. लोक सहभागातून आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्साठी प्रयत्नशील आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ई-संजीवनीच्या सारख्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याचा नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकाच वेळी ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या केंद्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांचा ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या भागातच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहे. येत्या काळात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मॉडेल करण्याचा मानस आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य आणण्याच्या प्रयत्न आहे. विविध मानकंनामध्ये पुणे जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांक आणण्यासाठी काम करण्यात येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४९ लाख ओपीडी होती. येत्या काळात कंत्राटी पद्धतीने ‘एएनएम’ ची भरती करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती श्री. पाटील यांनी केली.

श्री. खलाटे यांनी आपले विचार व्यक्त केले.मान्यवरांनी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनानंतर केंद्रातील सुविधांची पाहणी करुन माहिती घेतली.यावेळी मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राची चित्रफीत दाखविण्यात आली. ‘प्रोजेक्ट सेव्ह’ उपक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापती दिपाली हुलावळे, महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, सदस्य करण खलाटे, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, भारत फोर्जचे उपाध्यक्ष सदाशिव लोखंडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अभिषेक जैन, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

vishwatmaklokswamivarta

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड -उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी ! मंदिरांमधील ‘पेड दर्शन’ सुविधा बंद करा आणि देवस्थानांमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न