मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी
अमरावती, प्रतिनिधी: वडाळी उद्यान परिसरात भव्य ‘वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक’ उभारण्याबाबत चर्चा महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळालाही भेट देत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
पाहणीदरम्यान संजय राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक व दिमाखदार असे स्मारक उभारण्यात यावे, तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरूनही सदर स्मारक स्पष्टपणे दिसेल, अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश दिले. हे स्मारक अमरावती शहराची ओळख ठरणारे व नागरिकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच वडाळी तलाव परिसराचे सौंदर्यीकरण, पर्यटन विकास, प्रकाश व्यवस्था, नागरिकांसाठी सुविधा व स्मारक उभारणी संदर्भातील सर्व बाबींवर शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून संपूर्ण प्रस्ताव अंतिम करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून विकास कामांना चालना देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. वडाळी तलाव परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत व स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याबाबत उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली.