vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तराखंड, झारखंडच्या संस्कृतीतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन – राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या भावनेतून विविध राज्यांच्या संस्कृतीचा आदर आणि परस्पर संबंध दृढ करणे आवश्यक

उत्तराखंड, झारखंडच्या संस्कृतीतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन – राज्यपाल जिष्णु देव वर्मा  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या भावनेतून विविध राज्यांच्या संस्कृतीचा आदर आणि परस्पर संबंध दृढ करणे आवश्यक

मुंबई, प्रतिनिधी : भारताची सांस्कृतिक विविधता हीच आपली शक्ती असून, विविध राज्यांच्या संस्कृतीचा आदर, परस्पर समन्वय आणि बंधुभावातून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ झाली पाहिजे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचा उद्देश केवळ राज्यांचे स्थापना दिन साजरे करणे नसून, एकमेकांची संस्कृती समजून घेणे आणि परस्पर संबंध दृढ करणे हा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

उत्तराखंड आणि झारखंड राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त लोकभवनातील दरबार हॉल येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी उत्तराखंड आणि झारखंडमधील कलाकारांनी दोन्ही राज्यांची समृद्ध लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम सादर केले. २००० मध्ये तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या तीन नव्या राज्यांची निर्मिती झाली. उत्तराखंड ही देवभूमी असून बद्रीनाथ, केदारनाथ यांसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे, आदि शंकराचार्यांची तपोभूमी आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे या राज्याला आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशात विशेष स्थान आहे. उत्तराखंडने देशाला अनेक शूर सैनिक आणि लष्करी अधिकारी दिले असून, जनरल बिपिन रावत यांचे देशसेवेतील योगदान उल्लेखनीय आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यात विशेष आत्मीयतेचे नाते आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन्ही राज्यांमध्ये जनसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्रात स्थायिक झालेले उत्तराखंडचे नागरिक येथील संस्कृती आणि परंपरांमध्ये समरस झाले असून, अनेक जण मराठी भाषाही उत्तम बोलतात. हा सांस्कृतिक समन्वय राष्ट्रीय एकतेचे सुंदर उदाहरण असल्याचे राज्यपाल म्हणाले.

झारखंड भगवान बिरसा मुंडा यांची वीरभूमी असून, त्यांचे जीवन स्वाभिमान, साहस आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देते. खनिज संपत्ती, नैसर्गिक सौंदर्य, जनजातीय संस्कृती आणि कष्टाळू लोक ही झारखंडची खरी ताकद आहे. कृषी, फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यपालन, सेंद्रिय शेती तसेच उद्योजकता आणि स्टार्टअप क्षेत्रात या राज्याला मोठ्या संधी आहेत. तरुणांनी उद्योजकतेकडे वळून रोजगारनिर्मिती आणि आपल्या प्रदेशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र ही संतांची आणि समाजसुधारकांची भूमी, उत्तराखंड ही देवभूमी, तर झारखंड ही जनजातीय गौरव आणि नैसर्गिक संपत्तीची भूमी आहे. या तिन्ही राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारशातून देशाची विविधता अधोरेखित होते. महाराष्ट्रातील नागरिकांनी उत्तराखंड आणि झारखंडला भेट देऊन तेथील नैसर्गिक सौंदर्य व सांस्कृतिक वारसा जाणून घ्यावा, तसेच या राज्यांतील नागरिकांनीही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून घ्यावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित अभिनेत्री हिमानी शिवपुरी, बद्री केदार चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त केसर सिंह बिष्ट, जय फाउंडेशन व रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘ढोली’ या गढवाली चित्रपटाचे निर्माते शिशिर कृष्ण शर्मा, दिग्दर्शक दिनेश भोसले, यांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सन्मानित केले.

 कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी, कलाकार आणि उत्तराखंड व झारखंडमधील नागरिक उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 | लेखी परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न

महाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदा – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य राबविले जात आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार वैभव संगोपन योजनेंतर्गत शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे संगोपनासाठी; वरळी किल्ल्याच्या संवर्धनासाठीही प्रयत्न· बाणगंगा, वरळी कोळीवाडा आणि शिवडी किल्ल्यात वारसा जतनासोबत महिला सक्षमीकरणावर भर

vishwatmaklokswamivarta