चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात दिली भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश
मुंबईतील चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी, रुग्णालयात भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश
मुंबई प्रतिनिधी-चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात दिली भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश
चेंबूर परिसरातील डायमंड उद्यान परिसरात एका शाळेच्या बसवर आज (दिनांक ३० जून २०२६) दुपारी २.५८ वाजता पिंपळाचे जुने व मोठे झाड कोसळून ओढवलेल्या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यालगत असलेले जुने व मोठे पिंपळाचे झाड अचानक उन्मळून शाळेच्या धावत्या बसवर कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. ही घटना दुपारी सुमारे २.५८ वाजता घडली. संबंधित बस (एमएच ०३ / सीव्ही ७४३९) ‘युनिव्हर्सल हायस्कूल’ची असून, त्यामध्ये विद्यार्थी घरी परतण्यासाठी प्रवास करत होते. घटनेनंतर तत्काळ बचावकार्य राबविण्यात आले. बसमधील १३ विद्यार्थ्यांना चालक, वाहक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी अपघातात जखमी पाच विद्यार्थ्यांना झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती घटनास्थळी बचावकार्य करत असलेल्या मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी आणि पोलिसांनी दिली.
महापौरांनी घटनास्थळी बचावकार्याचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर झेन रुग्णालयात जाऊन मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच अतिदक्षता विभागात दाखल जखमी विद्यार्थ्याची विचारपूस केली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेतली.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत जखमी पाचपैकी अत्यंत गंभीर जखमी झालेल्या विहान श्रीवास्तव (वय ११ वर्षे) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. उर्वरित जखमी चारपैकी एका विद्यार्थिनीला उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. एक विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल आहे. जखमी चारही विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे वैद्यकीय तज्ञांनी नमूद केले.
दरम्यान, महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित रस्त्यांवरील झाडांची पावसाळापूर्व छाटणी (ट्रिमिंग) करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. असे असले तरी, या परिसरात अलीकडे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम झाले होते आणि स्थानिक नागरिकांकडून काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या का, याची पडताळणी केली जाणार आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
घटनास्थळी पाहणी प्रसंगी महापौरांसमवेत आमदार श्री. तुकाराम काते, उपमहापौर श्री. संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती आशा मराठे, बाजार व उद्याने समिती अध्यक्ष श्रीमती हेतल गाला, नगरसेविका श्रीमती समृद्धी काते, नगरसेवक श्री. महादेव शिवगण, नगरसेविका श्रीमती स्नेहल शिवकर तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, परिमंडळ उपायुक्त श्रीमती संध्या नांदेडकर, एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शंकर भोसले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.