
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली…
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी युवाशक्तीचे नवसंशोधनात मोठे योगदान आहे. त्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत, विकसित महाराष्ट्र घडेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश बलशाली व संपन्न देश म्हणून जगात लौकीक प्राप्त करीत आहे. मराठवाडासुद्धा सुजलाम सुफलाम करुन दुष्काळमुक्त करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत महात्मा जोतिबा फुले पुतळा संभाजीपेठ ते क्रांती चौक दरम्यान आयोजित भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते. या रॅलीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, रोहयो व पणन मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खा. अशोक चव्हाण, खा.स्मिता वाघ, आमदार रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत बंब,आ. अनुराधा चव्हाण, आ.मंगेश चव्हाण, आ. राम भदाणे तसेच महापौर समीर राजुरकर आदी मान्यवर तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादन केले. त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. रॅलीचा समारोप क्रांती चौकात झाला. तेथे उपस्थित जनसमुदायास संबोधित करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तिरंगा आमची आन बान आणि शान आहे. ह्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले. हा तिरंगा हिच आमची खरी ओळख आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संदेश दिला, ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा काढून देशप्रेमाने ओत प्रोत मातृभूमीचे दर्शन घडवू. त्यानुसार आज हा जनसमुदाय तिरंग्याच्या प्रेमासाठी एकत्र आला आहे.आज छत्रपती संभाजीनगर मध्ये तिरंगा रॅली गर्दीचे रेकॉर्ड तोडले, तिरंग्याचे वादळ मला दिसते आहे,अशा शब्दात त्यांनी छत्रपती संभाजीनगरवासियांचे कौतुक केले
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात गेल्या दशकात देशाला प्रगतीपथावर नेले. जगात बलशाली देश म्हणून ओळख निर्माण झाली, जगात ४ थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केलं. आपल्या राज्याची अर्थ व्यवस्था ५० लाख कोटीपर्यंत नेली. देश बदलतोय, राज्य बदलतंय, मराठवाडाही बदलतोय. आमचा संकल्प आहे मराठवाड्याच्या पुढच्या पुढीला दुष्काळ पाहू देणार नाही. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी मार्गे मराठवाड्यात आणून इथला भाग सुजलाम सुफलाम करू. आपण तिसरी स्टार्ट अप इको सिस्टीम तयार केली. त्यात तरुणाईचे योगदान मोठे आहे. नव संशोधनात तरुणाई अग्रेसर आहे. त्याबळावरच आपला भारत विकसित भारत म्हणून वाटचाल करीत आहे, असा संदेश त्यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वोत्तम संविधान दिलं. आपल्या हक्कासोबत कर्तव्य लक्षात ठेवावी आणि उत्तम नागरिक बनावे, असे उत्तम नागरिक बनून समाजाची ताकद बना. आपल्या मराठवाड्याला देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळालं. निजामच्या राजवटीतून मोकळा श्वास घेण्यासाठी हजारो देशभक्तांनी बलिदान दिलं. त्यांचे स्मरण आपण करू. आज आपण एकप्रतिज्ञा करू. आपल्या देशासाठी, राज्यासाठी समाजासाठी जगू.
सभास्थानी प्रारंभी वंदेमातरम, राज्यगीत झाले व राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला. या रॅलीत मोठ्या संख्येने स्वातंत्र्य सैनिक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, युवक, युवती सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी विविध कलापथक, ढोल लेझीम पथकांनी, संबळ वाद्य पथकांनी लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर घोषणांनी रॅली मार्गाचा परिसर दुमदुमून गेला होता.
0000



