vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार

संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार

मुंबई, प्रतिनिधी – सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून रामदास आठवले म्हणजे संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांचा गौरव केला.

केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमात नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार प्रवीण दरेकर, रामदास आठवले यांचे कुटुंबीय आणि चाहते यावेळी उपस्थित होते.संघर्षातून घडलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी अखंड निष्ठा राखणारे रामदास आठवले हे देशातील सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रभावी प्रतीक आहेत. दलित पँथर चळवळीपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यकर्त्याचा प्रवास असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संघर्षातून नेतृत्व घडले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीही कटुता आली नाही. सर्व समाजघटकांशी संवाद, सर्व पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि लोकांना आपलेसे करण्याची त्यांची शैली ही त्यांच्या यशामागील मोठी ताकद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांपासून ते लंडनमधील त्यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाच्या जतनापर्यंत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. बाबासाहेबांच्या विचारांशी तडजोड न करता त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार केला आहे. रामदास आठवले हे दिलदार मित्र, कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेतृत्व आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पुढील सार्वजनिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रामदास आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रभावी नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, रामदास आठवले यांनी गेली दहा वर्षे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचे कार्य केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीपासून ते ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

दलित पँथर चळवळीपासून संसदेपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आठवले यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सातत्याने जपले असून संविधानाच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. दीक्षाभूमीचा विकास, लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच सामाजिक न्यायाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रामदास आठवले यांची लोकाभिमुख कार्यपद्धती, हसरा स्वभाव आणि सर्वपक्षीय मैत्री जपण्याची भूमिका यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्यायाची मशाल अशीच प्रज्वलित ठेवत समता आणि संविधान मूल्यांसाठी त्यांचे कार्य पुढेही सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त गौरव करताना सांगितले की, आठवले यांनी केवळ मंत्री म्हणून नव्हे तर तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे लोकनेते म्हणून देशभर ठसा उमटवला आहे. विविध जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली असून वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांचे योगदान काही शब्दांत मांडणे अशक्य असल्याचे सांगून देशसेवेची त्यांची वाटचाल अधिक व्यापक व्हावी आणि भविष्यात त्यांच्यावर आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जाव्यात, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त गौरव करताना सांगितले की, सलग दहा वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात प्रभावीपणे कार्य करणे ही मोठी कामगिरी असून, समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि गरीब घटकांचा विश्वास संपादन करण्यात आठवले यशस्वी ठरले आहेत. दलित पँथर चळवळीपासून सुरू झालेल्या त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारांवर चालत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आंबेडकरी चळवळ बळकट केली. सामाजिक न्याय, वंचितांच्या हक्कांसाठीची लढाई, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने नेतृत्व केले असून, ते केवळ मंत्री नसून चळवळीतून घडलेले कार्यकर्ते आहेत. संघर्ष, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगत भुजबळ यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

संबंधित पोस्ट

प्रचाररथांच्या माध्यमातून ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ कामांना वेगशासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी- पालकमंत्री शंभूराज देसाई

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

6,600 स्थानकांवरील केंद्रीय सिग्नल नियंत्रणामुळे रेल्वे सुरक्षिततेत वाढ.