हृदयविकारग्रस्त बालकांसाठी मोठा दिलासा; ५ जुलै रोजी गडचिरोलीत मोफत हृदय तपासणी शिबिर”आवश्यक बालकांवर मुंबईत मोफत हृदय शस्त्रक्रिया; पालकांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा; जिल्हाधिकाऱ्यांचे जास्तीत जास्त सहभागाचे आवाहन
हृदयविकारग्रस्त बालकांसाठी मोठा दिलासा; ५ जुलै रोजी गडचिरोलीत मोफत हृदय तपासणी शिबिर”आवश्यक बालकांवर मुंबईत मोफत हृदय शस्त्रक्रिया; पालकांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा; जिल्हाधिकाऱ्यांचे जास्तीत जास्त सहभागाचे आवाहन*
गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील ० ते १८ वर्षांतील जन्मजात हृदयविकार तसेच इतर हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त बालकांसाठी रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे मोफत टु-डी-इको व हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणीनंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर मुंबई येथे अत्याधुनिक रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार व हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असून जिल्ह्यातील कोणतेही पात्र बालक या संधीपासून वंचित राहू नये, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड . आशिष जयस्वाल यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभाग, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष उपक्रमाचा उद्देश दुर्गम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना वेळेत निदान, तज्ज्ञ उपचार आणि अत्याधुनिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, जन्मजात हृदयविकाराचे वेळेत निदान आणि उपचार झाल्यास अनेक बालकांचे प्राण वाचू शकतात तसेच त्यांना निरोगी आयुष्य मिळू शकते. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना मोठ्या शहरांमध्ये उपचार घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून, आवश्यक असलेल्या प्रत्येक बालकावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलांची तपासणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
या सामाजिक उपक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या असून, दुर्गम भागातील गरजू बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या शिबिराची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त पात्र बालकांना या शिबिराचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
*जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हावासीयांना जास्तीत जास्त सहभागाचे आवाहन*जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनीही जिल्ह्यातील पालकांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, दुर्गम भागातील अनेक बालकांना योग्य वेळी हृदयविकाराचे निदान होत नसल्याने उपचारास विलंब होतो. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार असून, आवश्यक बालकांवर मुंबई येथे मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे ० ते १८ वर्षांतील ज्या मुलांना हृदयाशी संबंधित कोणताही त्रास अथवा लक्षणे दिसून येत असतील, अशा सर्व मुलांना या शिबिरात आणावे.
*खालील लक्षणे असलेल्या बालकांनी तपासणी करून घ्यावी*- जन्मजात हृदयात छिद्र असणे.- आईचे दूध पिताना किंवा खेळताना श्वास घेण्यास त्रास होणे.- वारंवार दम लागणे.- वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे.- हात-पायांची नखे किंवा ओठ निळे पडणे.- हृदयाशी संबंधित इतर कोणतीही लक्षणे जाणवणे.शिबिरामध्ये सर्व बालकांची मोफत 2D Echo तपासणी करण्यात येणार असून तज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञांकडून आवश्यकतेनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
*शिबिराची माहिती*दिनांक : रविवार, दि. ५ जुलै २०२६वेळ : सकाळी ८.०० ते दुपारी ३.००स्थळ : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोलीवयोगट : ० ते १८ वर्षे
हृदयविकाराचे वेळेत निदान आणि उपचार हे बालकांच्या निरोगी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेऊन आपल्या पाल्यांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.