
पुण्यातील पिंपरी-चिंचवड विभागातील दुर्दैवी घटना-दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज….
पुणे प्रतिनिधी-. पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात दुपारी एका तीन मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. इमारत कोसळल्याने किमान 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या इमारतीत कचरा प्रक्रिया केंद्राचे प्रशासकीय कार्यालय होतं. मुसळधार पावसामुळे इमारतीशेजारील कचऱ्याचा मोठा ढिगारा सरकल्याने ही इमारत कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी भागात असलेल्या या घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन मदत यंत्रणांची पथकं तातडीने दाखल झाली आहेत. सध्या तिथे बचावकार्य सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी कोसळलेली इमारत ही ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाची प्रशासकीय इमारत आहे; या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘अँटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड’सोबत करार केला होता.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे की, “हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाचा प्रशासकीय विभाग आहे.”
ही इमारत जुना कचरा डेपो किंवा डम्पसाइट्सवर दीर्घकाळापासून पडून असलेला प्रक्रिया न केलेला घनकचरा आणि औद्योगिक उप-उत्पादने ढिगाऱ्यालगत स्थित असल्याचंही ते म्हणाले. “या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा भाग सरकला आणि दरड कोसळल्याप्रमाणे तो या इमारतीवर येऊन पडला,” असं सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.
“त्यावेळी इमारतीत सुमारे 20 लोक होते आणि त्यापैकी चौघे जण बाहेर पडण्यात यशस्वी झाले. आता 15-16 लोक अजूनही आत अडकलेले आहेत. आम्ही त्यातील काहींशी संपर्क साधू शकलो आहोत आणि ते सुरक्षित असल्याचं दिसत आहे. एनडीआरएफचे (NDRF) पथक येथे पोहोचलं आहे आणि इतर बचाव पथकंही येथे दाखल झाली आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.
महापालिकेचे शहर अभियंता आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख असलेल्या संजय कुलकर्णी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, “पहिल्या मजल्यावरील चार कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीच्या तळमजल्यावर 15 कामगार होते; ते तिथे अडकले आहेत. हे कामगार मदतीसाठी ओरडत होते”
अग्निशमन दल आणि एनडीआरएफला (NDRF) सूचित केले असून, ते घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य हाती घेतलं आहे. मोशी येथे पोहोचलेले आणखी एक महानगरपालिका अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, “आम्ही अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधला आहे. एनडीआरएफ (NDRF) बचावकार्य करत आहे.”
000



