केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (CBN) ‘ऑपरेशन ब्लॅक हॉक्स’ अंतर्गत आंतरराज्य हेरॉईन तस्कर टोळीचा पर्दाफाश केला, 18.6 किलो कच्चे हेरॉईन जप्त आंतरराज्य टोळीच्या 3 प्रमुख सदस्यांना अटक..
मुंबई प्रतिनिधी-
अंमली पदार्थ तस्करी विरोधातील एका मोठ्या कारवाईअंतर्गत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील कार्यालयांनी ऑपरेशन ब्लॅक हॉक्स यशस्वीरित्या पार पाडत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे केलेल्या सातत्यपूर्ण कारवाईत 18.6 किलो कच्चे हेरॉईन जप्त केले. याशिवाय आंतरराज्य टोळीतील तीन म्होरक्यांना देखील अटक केली आहे. जप्त केलेले अंमली पदार्थ ईशान्येकडील राज्यातून आणले गेले होते आणि उत्तर प्रदेशात त्याचे वितरण केले जाणार होते.
ईशान्येकडील राज्यातून अमली पदार्थ उत्तर प्रदेशात आणले जाणार असल्याबद्दल केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या मध्य प्रदेश मधील कार्यालयाने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे ब्युरोच्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या संयुक्त पथकाने सुलतानपूर-लखनऊ महामार्गावर सापळा रचून 20–21ऑगस्ट, 2026 रोजी गस्त घातली. वेगवेगळ्या टोलनाक्यांवर सातत्यपूर्ण टेहळणी करताना 21 ऑगस्ट रोजी या पथकाने आसाम येथे नोंदणी केलेली एक ह्युंदाई क्रेटा कार अडवली. हे वाहन रिकामे होते आणि त्यातील प्रवासी आपण अनभिज्ञ असल्याची बतावणी करत होते. चौकशी केल्यावर वाहनातील प्रवाशांनी केवळ 500 किलोमीटरच्या अंतरात चार वेळा इंधन भरल्याचे उघड केल्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना संशय आला. कारच्या पेट्रोल टाकीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यात पोकळ ध्वनी असल्यासारखे जाणवले लखनऊ येथील ब्युरोच्या कार्यालयात तांत्रिक मदतीच्या साहाय्याने इंधन टाकी उघडण्यात आली. त्यामध्ये तयार केलेला एक विशेष कप्पा आढळला, ज्यात 25 जलरोधक पाकिटांमध्ये एकूण 16.46 किलो कच्चे हेरॉईन लपवून ठेवले होते. त्यानंतर दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली.
आणखी एका गुप्तचर कारवाईअंतर्गत सिलीगुडीवरून लखनऊच्या दिशेने येणारा एक अवजड ट्रक अवैध माल वाहून नेत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ब्युरोच्या उत्तर प्रदेश कार्यालयाच्या पथकाने अनेक टोल नाक्यांवर पाळत ठेवून त्या ट्रकचा मागोवा घेतला आणि अखेरीस त्या ट्रकला बाराबंकीजवळ अडवले.ट्रकची कसून झडती घेतली असता, ट्रकच्या बॉडी फ्रेममध्ये बनवलेल्या एका गुप्त कप्प्यात 2.16 किलो कच्चे हेरॉईन लपवल्याचे आढळून आले. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली.
तिन्ही संशयितांवर अमली पदार्थ आणि मानसोपचारविषयक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985च्या कठोर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी वापरलेली दोन्ही वाहने आणि तस्करीचा संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे. ईशान्य भारतातील पुरवठादारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित वितरण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सध्या व्यापक आर्थिक आणि लॉजिस्टिकल तपास सुरू आहे.
प्रमुख जप्ती एका दृष्टिक्षेपात,एकूण जप्त केलेले अमली पदार्थ: 18.64 किलो (एका कारमधून 16.48 किलो आणि एका अवजड व्यावसायिक वाहनातून 2.16 किलो)जप्त केलेली वाहने: एक आसाम-नोंदणीकृत ह्युंदाई क्रेटा, एक अवजड व्यावसायिक ट्रक.एकूण अटक: 3 संशयित (एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत अटक)लपवण्याच्या पद्धती: इंधन टाकीची बनावट पोकळी आणि ट्रकमधील गुप्त कप्पे तयार करण्यात आले होते