
बांधकामे, गार्डन, स्टेडियम, इन्स्टिट्युट येथे प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करावा – नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे
नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात या पावसाळी कालावधीत 1594.20 मिमी पावसाची नोंद झालेली असून 78.76 मि. इतकी सध्याची धरण पातळी आहे व त्यामध्ये 40.62 % इतका वापरयुक्त जलसाठा आहे. 1 जुलैपासून 8 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असली तरी त्यानंतर पावसाने उसंत घेतली असल्याचे चित्र असून आपण पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याची जाणीव करून देत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील बांधकामांसाठी कोणत्याही परिस्थितीत पिण्यायोग्य पाण्याचा वापर होणार नाही व प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे स्टेडियम, खाजगी गार्डन, इन्स्टिट्युट येथेही प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामधारकांनी आपल्या बांधकामांसाठी पिण्याचा पाण्याचा वापर करत असल्यास तो पूर्णपणे थांबवून महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करावा असे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सूचित केले आहे. तसेच नगररचना विभाग, अभियांत्रिकी विभाग व त्यावर निरीक्षण ठेवणारी विभाग कार्यालये यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची नियमित खातरजमा करून घ्यावी असे निर्देश दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या व नियोजित कामांचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. दिग्विजय चव्हाण आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.



