vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगडचा सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी -मंत्री भरत गोगावले,स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न

रायगडचा सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी -मंत्री भरत गोगावले,स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न..

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: नागरिकांच्या आशा-आकांक्षांचा विचार करून विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, योग्य नियोजन, उत्पन्नाच्या स्रोतांची वाढ आणि विविध विकास प्रकल्पांचा गतीने पाठपुरावा करून भविष्यातील ‘विकसित रायगड जिल्हा’ साकारणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

        भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात मंत्री गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

      या सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आणि उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले यांनी स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रायगड जिल्ह्यातील 12 किल्ल्यांचा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला असून ही बाब आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासन महाराष्ट्राला 1 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कटिबद्ध असून मुंबई-पुण्यासोबतच रायगड जिल्हा राज्याच्या विकासाचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येत आहे. अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सागरी मार्गांमुळे जिल्ह्याचा मोठा कायापालट होत असून ‘तिसरी मुंबई’ रायगड जिल्ह्यात आकारास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

       शेतकऱ्यांच्या कल्याणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ वेगाने राबवली जात आहे. रायगड जिल्ह्यातील 2 हजार 800 हून अधिक शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले असून 1 हजार 859 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 कोटी 95 लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे.

       ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात रायगड जिल्ह्याने राष्ट्रीय स्तरावर उमटवलेल्या ठशाचा त्यांनी गौरव केला. खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायतीने जलसमृद्ध श्रेणीत देशात प्रथम, चांभारली ग्रामपंचायतीने सामाजिक सुरक्षेत देशात द्वितीय, वासांबे ग्रामपंचायतीने आत्मनिर्भर पंचायत श्रेणीत देशात प्रथम आणि अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून इतिहास घडवला आहे.

     महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात 151 हेल्पलाईन आणि 16 हिरकणी कक्ष कार्यरत असून रायगडमधील 4 लाख 76 हजार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचे मानधन थेट मिळत आहे. तरुणांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ प्रभावीपणे राबवली जात आहे.

       माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबवण्यात येत असून 21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून “पाणी अडवा, पाणी जिरवा” हा संकल्प पूर्ण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

       कार्यक्रमादरम्यान मंत्री महोदयांच्या हस्ते जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले व उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे गुणवंत विद्यार्थी आणि आपत्कालीन मदतीसाठी तत्पर असणाऱ्या ‘आपदा मित्रांचा’ सन्मान करण्यात आला. या मुख्य सोहळ्यानंतर मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते वरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक ‘इंग्लिश लँग्वेज लर्निंग लॅब’चे लोकार्पण करण्यात आले.

00000000

संबंधित पोस्ट

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत बैठक…

पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न**-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदू संघटनांची उपस्थिती!शिवछत्रपतींचा अवमान सहन करणार नाही; ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार!

vishwatmaklokswamivarta

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी