अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि योग्य दिशेने करण्यात यावा, हत्येतील प्रमुख आरोपींसह सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत धीरज परदेशी यांच्या पत्नी सौंदर्या परदेशी यांनी पीडित कुटुंबाची भूमिका मांडत न्यायासाठी विविध मागण्या केल्या.
धीरज परदेशी यांच्यावर ७ ऑगस्ट २०२६ रोजी हल्ला झाला आणि ९ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र जनसंताप निर्माण झाला असून नागरिक, सामाजिक संघटना आणि कामगार संघटनांमध्येही संतापाची भावना असल्याचे त्यांनी सांगितल
भगवा टिळा लावल्यावरून हल्ला झाल्याचा आरोप धीरज परदेशी हे नियमितपणे कपाळावर भगवा टिळा लावत होते. भगवा टिळा लावत असल्याच्या कारणावरूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. या प्रकरणाबाबत सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमधून चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप सौंदर्या परदेशी यांनी केला.“धीरज कायम भगवा टिळा लावत होते. या प्रकरणाबाबत फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. आम्हाला सत्य समोर यावे आणि न्याय मिळावा,” अशी भूमिका सौंदर्या परदेशी यांनी मांडली.
घटनेपूर्वी पतीशी फोनवर संवाद,सौंदर्या परदेशी यांनी सांगितले की, ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता घटनेपूर्वी धीरज यांच्याशी त्यांचा फोनवर संवाद झाला होता. त्यावेळी धीरज यांनी “जेवण केले आहेस का?” अशी विचारणा केली होती. त्यानंतर घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून संपूर्ण घटनाक्रमाची सत्यता तपासातून समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली
प्रमुख आरोपींसह सूत्रधारांचा शोध घ्या हत्येतील प्रमुख आरोपींसह या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. प्रत्यक्ष हल्लेखोरांबरोबरच कटात सहभागी असलेल्या आणि हत्येमागे भूमिका बजावणाऱ्या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
धीरज परदेशी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले का, सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी त्यांच्यावर मारहाण करण्यात आली का आणि संपूर्ण घटनाक्रमामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.निष्पक्ष तपासासाठी सक्षम यंत्रणेकडे तपास सोपवा,या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावा यासाठी आवश्यक असल्यास सक्षम तपास यंत्रणेकडे तपास सोपवावा, अशी मागणी जगताप यांनी केली. तपासावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवावी. तपासात जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणाने त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी,धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी सौंदर्या परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळ प्रलंबित राहू नये आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चांगला सरकारी वकील नियुक्त करा ,या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने न्यायालयीन लढा प्रभावीपणे लढला जावा यासाठी अनुभवी आणि सक्षम सरकारी वकील नियुक्त करावा, अशी मागणीही सौंदर्या परदेशी यांनी केली. तपासापासून न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत कुटुंबाला शासनाकडून पूर्ण कायदेशीर सहकार्य मिळावे, असे त्यांनी सांगितले.
पत्नीला सन्मानजनक सरकारी नोकरीची मागणी,धीरज परदेशी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट आले आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी सौंदर्या परदेशी यांना सन्मानजनक सरकारी नोकरी देण्यात यावी, तसेच कुटुंबाला आवश्यक आर्थिक आणि सामाजिक मदत शासनाने करावी, अशी मागणीही करण्यात आली. या सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अहिल्यानगरमधील जनभावना आणि पीडित कुटुंबाची भूमिका त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी,पत्रकार परिषदेत अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरातील एका हल्ल्याचाही संदर्भ देण्यात आला. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत, अशा घटनांमध्ये पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करावी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.
“आम्हाला सत्य आणि न्याय हवा”“धीरज महापालिकेत काम करत होते. ते नियमितपणे भगवा टिळा लावत होते. या घटनेबाबत चुकीची माहिती आणि फेक न्यूज पसरवली जात आहे. आम्हाला या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,” अशी भावना सौंदर्या परदेशी यांनी व्यक्त केली.धीरज परदेशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून हत्येमागील संपूर्ण कटाचा पर्दाफाश करावा, प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करावा, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, सक्षम सरकारी वकील नियुक्त करावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप आणि सौंदर्या परदेशी यांनी केली.
धीरज परदेशी यांना न्याय मिळेपर्यंत हा विषय सरकारसमोर आणि जनतेसमोर सातत्याने मांडत राहणार, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.