
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांचा वापर करा
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच पाली फाटा (खोपोली)-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण व पर्यायी मार्गांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरातील गणेशभक्त गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी, तळ कोकणात जात असतात. त्यामुळे दि. १४ सप्टेंबर रोजीच्या गणेश प्रतिष्ठापना तसेच त्यानंतरच्या कालावधीत महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी झाल्यास वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : पेण येथे कोंडी झाल्यास- तरणखोप–पेण बायपास–गागोदे–वरसई–पाली फाटा–परळी–जांभुळपाडा–पाली–वाकण. वडखळ येथे कोंडी झाल्यास-वडखळ-पोयनाड–पेझारी चेकपोस्ट–कुडूस–नागोठणे–वाकण.नागोठणे येथे कोंडी झाल्यास : नागोठणे–वेलशेत फाटा–वरवठणे–भिसेखिंड–वाकण. नागोठणे–वेलशेत फाटा–वरवठणे–भिसखिंड–रोहा–वाकण.
वाकण-नागोठणे येथे कोंडी झाल्यास : वाकण–पाली–नांदगाव–विळे–सुतारवाडी–कोलाड. वाकण–पाली–नांदगाव–विळे–निजामपूर–माणगाव. वाकण–पाली–नांदगाव–विळे–निजामपूर–माल्याचीवाडी–बोरवाडी–जांभुळवाडी–ढालघर.
कोलाड येथे कोंडी झाल्यास :कोलाड–सुतारवाडी–विळे–निजामपूर–माणगाव.माणगाव येथे कोंडी झाल्यास :माणगाव–निजापूर नाका–साईराम हॉटेल ब्रिज–मुगवली ब्रिज.लोणेरे येथे कोंडी झाल्यास :लोणेरे–गोरेगाव–नांदवी–आंबेत–म्हाप्रळ. राजेवाडी फाट्यापुढे पोलादपूरच्या दिशेने कोंडी झाल्यास : टोळफाटा (महाड)–आंबेत–म्हाप्रळ.ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना दि. ११ सप्टेंबर २०२६ पासून दि. २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००००



