मुंबईची ओळख असलेल्या ससून गोदीचा येत्या तीन वर्षांत कायापालट करून देशातील आदर्श #मत्स्यबंदर म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न-निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबईची ओळख असलेल्या ससून गोदीचा येत्या तीन वर्षांत कायापालट करून देशातील आदर्श #मत्स्यबंदर म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न-निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर .
मुंबई प्रतिनिधी-मुंबईची ओळख असलेल्या ससून गोदीचा येत्या तीन वर्षांत कायापालट करून देशातील आदर्श #मत्स्यबंदर म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गोदीच्या आधुनिकीकरणासोबतच मच्छीमारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक, महिला मच्छीमारांच्या मुलांसाठी पाळणाघर, कामगारांसाठी उपाहारगृह, विश्रांतीगृह आणि गोदामांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या वतीने आणि मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ससून गोदीतील महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. सुरक्षा किटमध्ये हातमोजे, सुरक्षा बूट, डोक्याचे संरक्षण करणारे आवरण, बोटांच्या संरक्षणासाठी संरक्षक साहित्य आणि मास्क यांचा समावेश आहे. महिलांचे काम अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या किटमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
ससून गोदीच्या आधुनिकीकरणांतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बर्फ भरण्याच्या प्रक्रियेचे स्वयंचलन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन लिलावगृह आणि कामगारांसाठी विश्रांतीच्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. तसेच रस्ते, प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे.
मच्छीमार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली असून, त्यासाठी १ हजार २४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ससून गोदीतील विकासकामे वेळेत पूर्ण करून मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.गोदी बंद होणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
यावेळी आमदार राजेश राठोड, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, भारतीय मत्स्य सर्वेक्षणाचे महासंचालक डॉ. श्रीनाथ के. आर., डॉ. विनोद, विविध मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, मच्छीमार महिला तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.