27 ऑक्टोबरला नवी मुंबईत राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम…
नवी मुंबई प्रतिनिधी सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून त्या अनुषंगाने राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येते. यंदा राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्याप्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांद्वारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी सेविकांद्वारे ही गोळी देण्यात येईल. या दिवशी गैरहजर असणा-या मुलांकरिता मॉप अप दिन अर्थात दि.०३ नोव्हेंबर २०२६ रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
१ ते १९ वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. कृमीदोष हा रक्तक्षय, कुपोषण, तसेच बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.
जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम एकूण ५ रुग्णालये, २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५९ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे व १७ आपला दवाखाना यांचेमार्फत राबविण्यात येणार आहे.
सदर मोहिमेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व नियोजन केले असून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या एकत्रित सभा घेऊन संबंधित एएनएम, आशा, अंगणवाडी शिक्षिका, शाळेचे समन्वयक अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे तसेच अभियानाची जनजागृती नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत करण्यात येत आहे.
मुलांचे आरोग्य उत्तम ठेवणे आणि या पोषण स्थिती व शिक्षणाचा दर्जा उंचावणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घेत नागरिकांनी आपल्या १ ते १९ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी तसेच त्या दिवशी शक्य न झाल्यास मॉप अप दिनी दि. ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी कृमीदोषामुळे होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणापासून प्रतिबंध करण्यासाठी जंतनाशक गोळी द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.