
१२ गृहनिर्माण संस्थांमध्ये गैरव्यवहार;सदनिका खरेदीविक्रीसाठी अवसायकांची परवानगी आवश्यक
छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी)- सहजापूर व शरणापूर येथे शासनाच्या गटविमा योजनेअंतर्गत प्राप्त कर्जधारक संस्थांच्या गृहकर्जातून उभारलेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले असून त्या संस्थांवर शासनाने अवसायकांची नेमणूक केली आहे. तथापि, यासंस्थांमधील सदनिकांची खरेदी विक्री करण्यासाठी अवसायकांची परवानगी आवश्यक असल्याचे तालुका उपनिबंधक विलास कोळेकर यांनी कळविले आहे.
शासकीय, निमशासकीय कर्मचारी सभासद असलेल्या १२ गृहनिर्माण संस्थांमध्ये या सदनिका बांधण्यात आल्या आहेत. त्यात सर्व सभासद कर्मचाऱ्यांचे शासकीय वेतन तारण ठेवून गटविमा योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेले आहे. मात्र या सदनिकांची मुख्य प्रवर्तक, अध्यक्ष यांनी परस्पर , खोट्या दस्तऐवजांद्वारे विक्री करुन शासकीय कर्जाची रक्कम कोषागारात जमा न करता हडप केली, याबाबी उघड झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ अन्वये या संस्थांवर अवसायक नेमले आहेत. याबाबत अवसायक आवश्यक कायदेशीर कारवाई करीत आहेत. तथापि, सभासदांनी वा अन्य व्यक्तिंनी या संस्थांमधील सदनिकांची खरेदी विक्री करण्याआधी अवसायकांची परवानगी घ्यावी. त्यांच्या संमतीशिवाय व्यवशार करुन नये. असे परस्पर खरेदी विक्रीचे व्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे अवसायक सी.एस. बेग यांनी कळविले आहे.या सर्व १२ संस्था असून त्या सहजापूर व शरणापूर येथील आहेत. त्यांची माहिती याप्रमाणे-
सहजापूर येथील संस्थाः-१.राजदिप सह.गृहनिर्माण संस्था, गट नं.५१ येथे ५४ सभासद व १ कोटी ३५ लक्ष ९३ हजार रुपये इतकी मंजूर कर्ज रक्कम.२. अनामिका छाया सह. गृहनिर्माण संस्था, म. ६४ सभासद व १ कोटी ६५ लक्ष ७७ हजार ९४० रुपये मंजूर कर्ज रक्कम.३. अष्टगंध सह.गृहनिर्माण संस्था, गट नं.५१ येथे ४६ सभासद व १ कोटी ४३ लक्ष ३६ हजार ६५० रुपये इतकी मंजूर कर्ज रक्कम.४. मनःशांती सह.गृहनिर्माण संस्था, गट नं.५१ येथे ५१ सभासद व १ कोटी १५ लक्ष ६३ हजार रुपये इतकी मंजूर कर्ज रक्कम.५. अरुणोदय सह.गृहनिर्माण संस्था, गट नं.५१ येथे ६८ सभासद व १ कोटी ५७ लक्ष २१ हजार ५०० रुपये इतकी मंजूर कर्ज रक्कम.६. जान्हवी सह.गृहनिर्माण संस्था, गट नं.५१ येथे ५८ सभासद व १ कोटी ६६ लक्ष २५० रुपये इतकी मंजूर कर्ज रक्कम
याशिवाय -प्रितीसंगम सह. गृहनिर्माण संस्था, शरणापूर, ज्ञान सरिता सह. गृहनिर्माण संस्था, शरणापूर, न्यू आनंदवन सह. गृहनिर्माण संस्था सहजापुर, रजनीगंधा सह. गृहनिर्माण संस्था सहजापूर, प्रभातकिरण सह. गृहनिर्माण संस्था सहजापूर, प्रभातसरिता सह. गृहनिर्माण संस्था शरणापूर या संस्थांबाबतच्या प्रकरणांची माहिती उपलब्ध नाही, असे अवसायक बेग यांनी कळविले आहे.
प्रमुख आक्षेपः- अवसायकांनी या संस्थाच्या कारभारात खालीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत. त्यात मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष यांनी निवडणूका न घेता स्वयंघोषीत पद्धतीने अध्यक्ष नियुक्त केले. मनमानेल त्या पद्धतीने सदनिका विक्री केले. सेवानिवृत्ती वेळी सभासदांनी कर्ज भरणा केला मात्र अशा सभासदांना त्यांच्या सदनिका न देता त्या परस्पर खोट्या दस्ताद्वारे विक्री केल्या व रक्कम शासकीय कर्जापोटी कोषागारात जमा न करता हडप केली. समिती सभा, विशेष सभा , वार्षिक सभा घेतलेल्या नाहीत. हिशोबाची कीर्द लिहिली नाही. दरवर्षी लेखापरिक्षण केले नाही. या प्रमाणे आक्षेप अवसायकांनी नोंदविले आहेत.
०००००



