vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’; लाखनी ‘पुस्तकांचे गाव’ जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र कक्ष; मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद

गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’; लाखनी ‘पुस्तकांचे गाव’-जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र कक्ष; मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद..

भंडारा, प्रतिनिधी : मराठी भाषा विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘कवितेचे गाव’ आणि ‘पुस्तकांचे गाव’ विकसित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील कवी ना. रा. शेंडे यांचे गणेशपूर हे गाव ‘कवितेचे गाव’, तर ज्येष्ठ लेखक द. सा. बोरकर यांचे लाखनी हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. सामंत यांनी संवाद साधला. यावेळी मराठी शाळा सुरू राहाव्यात, मराठी भाषेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच मराठी साहित्य आणि मराठी भाषा विभाग यांच्यात अधिक प्रभावी संवाद निर्माण व्हावा, याबाबत साहित्यिकांनी विविध सूचना मांडल्या. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्यासाठी मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

यावेळी प्रा. सुमंत देशपांडे, सुरेश खोब्रागडे, डॉ. ममता राऊत, विवेक कापगते, लक्ष्मीकांत कापगते, अमृत बनसोड यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांनी विविध विषयांवर मते मांडली. मराठी माध्यमाच्या शाळांचे संवर्धन, झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन आणि जिल्ह्यात नाट्यगृहाची निर्मिती तातडीने करण्याबाबतच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा या मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या आहेत. या बोलीभाषांमुळे मराठी भाषेच्या शब्दसंपदेत मोठी भर पडली आहे. त्यामुळे विविध बोलीभाषांतील शब्दांचा स्वतंत्र बोलीभाषा शब्दकोश तयार करण्यात येणार आहे. डॉ. यशवंतराव चव्हाण अनुवाद समितीच्या माध्यमातून मराठी साहित्याचे अनुवाद, प्रकाशनापासून वितरणापर्यंतची कार्यवाही मराठी भाषा विभागामार्फत करण्यात येईल. विभागीय स्तरावर पुस्तक परीक्षण समित्या स्थापन करण्यात येणार असून, दरवर्षी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

चांदा ते बांदा’ या संकल्पनेतून राज्यातील साहित्यिक, लेखक आणि कवींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बोलीभाषा, साहित्य आणि लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा विभागाचे मासिक सुरू करण्याचा मनोदयही मंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांच्यासह जिल्ह्यातील ७० हून अधिक साहित्यिक, लेखक आणि कवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिषेक नामदास यांनी केले.

 

******

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन   

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

बंद कालावधीत औषध पुरवठ्याकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन दि स्पॉट तक्रारीचा निपटारा..

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*