vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणेशोत्सवात प्रसाद, अन्नदान करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी अन्न सुरक्षाविषयक नियमांचे पालन-Festivals.MahaFDA.in पोर्टलवर प्रसाद व अन्नदानाची माहिती सादर करण्याचे आवाहन

गणेशोत्सवात प्रसाद, अन्नदान करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी अन्न सुरक्षाविषयक नियमांचे पालन-Festivals.MahaFDA.in पोर्टलवर प्रसाद व अन्नदानाची माहिती सादर करण्याचे आवाहन

सांगली, प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार प्रसाद तसेच अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेसारख्या घटना टाळता याव्यात, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष अन्न सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवात प्रसाद, अन्नदान करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी अन्न सुरक्षाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) नीलेश मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी सण-उत्सवां कालावधीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 व त्याअंतर्गत नियम व विनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 03 सप्टेंबर 2026 रोजी विशेष स्थायी आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार सण-उत्सवाच्या कालावधीत प्रसाद, अन्नदान तसेच विविध अन्नपदार्थांचे उत्पादन व वितरण याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना ज्या गणेश मंडळांमार्फत गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रसाद, महाप्रसाद, अन्नदान, भोजन अथवा अन्य कोणत्याही स्वरूपात अन्नपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे, अशा मंडळांनी त्यासंबंधीची संपूर्ण माहिती अन्न व औषध प्रशासनास सादर करावी. अन्न व औषध प्रशासनाच्या स्थायी आदेशासोबत जोडलेल्या परिशिष्ट-क मधील आवश्यक माहिती संबंधित गणेश मंडळांनी पूर्ण व अचूक भरावी. सदर माहिती Festivals. MahaFDA.in या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करावी. प्रसाद/अन्नदानाचे स्वरूप, अन्नपदार्थ तयार करण्याचे व वितरणाचे ठिकाण, दिनांक व वेळ, अन्नपदार्थाचा प्रकार, अंदाजे लाभार्थी/भाविक संख्या, अन्न तयार करणारा केटरर किंवा अन्य अन्न व्यावसायिक असल्यास त्याची माहिती इत्यादी आवश्यक तपशील अचूकपणे नोंदवावेत

   गणेशोत्सवात प्रसाद/महाप्रसाद/अन्नपदार्थ तयार करून वाटप करणाऱ्या मंडळांनी त्यांच्या कार्याच्या स्वरूपानुसार FSSAI अंतर्गत आवश्यक नोंदणी करून घ्यावी. त्यासाठी FOSCOS पोर्टलवर लागू असलेली Temporary Stall Registration नोंदणी प्राप्त करून घ्यावी. बाहेरील केटरर, मिठाई उत्पादक, भोजनालय अथवा अन्य Food Business Operator (FBO) यांच्याकडून प्रसाद किंवा भोजन तयार करून घेतले जात असल्यास वैध FSSAI परवाना/नोंदणी असलेल्या व्यावसायिकाची सेवा घ्यावी व त्याची माहिती उपलब्ध ठेवावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा/मावा, तूप, खाद्यतेल, मिठाई व इतर पदार्थ विश्वसनीय व FSSAI परवानाधारक/नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावेत. खरेदीची बिले/पावत्या जतन करून ठेवाव्यात.

       प्रसाद किंवा भोजन तयार करण्यासाठी स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करावा. अन्न तयार करणाऱ्या व हाताळणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तिक स्वच्छता राखावी. अन्न तयार करण्याची जागा, भांडी, उपकरणे व परिसर स्वच्छ ठेवावा. तयार प्रसाद/अन्नपदार्थ धूळ, माशा, कीटक व अन्य दूषित घटकांपासून सुरक्षित ठेवावेत. तयार अन्न दीर्घकाळ असुरक्षित तापमानात ठेवणे टाळावे आणि शक्यतो तयार केल्यानंतर योग्य कालावधीत त्याचे वितरण करावे. मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करण्यात येत असल्यास अन्न तयार करणे, साठवण व वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. अन्न हाताळणाऱ्या स्वयंसेवकांनाही आवश्यक स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात. कोणत्याही प्रसाद किंवा अन्नपदार्थाच्या गुणवत्ता अथवा सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाल्यास त्याचे वितरण करू नये. अन्न विषबाधा किंवा तत्सम घटना आढळल्यास संबंधित आरोग्य यंत्रणा व अन्न व औषध प्रशासनास तातडीने माहिती द्यावी

अन्न सुरक्षा प्रशासनाची कार्यवाहीस्थायी आदेशानुसार सण-उत्सवाच्या काळात High-Risk अन्नपदार्थ व आस्थापनांची जोखीम-आधारित तपासणी, नमुने घेणे आणि आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. गणेशोत्सव कालावधीत अन्न सुरक्षा अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन प्रसाद/अन्न तयार करण्याची व वितरणाची व्यवस्था, कच्च्या मालाची गुणवत्ता, स्वच्छता, FSSAI नोंदणी/परवाना इत्यादी बाबींची पडताळणी करू शकतात. सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे.

गणेश मंडळांना विशेष आवाहन”श्रद्धेसोबत अन्नसुरक्षाही महत्त्वाची” या भूमिकेतून गणेशोत्सव साजरा करताना भाविकांना दिला जाणारा प्रसाद व अन्न सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार राहील याची प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने दक्षता घ्यावी. प्रसाद/अन्नदान करणाऱ्या सर्व गणेश मंडळांनी Festivals. Maha FDA.in पोर्टलवर परिशिष्ट-क मधील विहित माहिती सादर करून आवश्यक FSSAI/FOSCOS नोंदणीची पूर्तता करावी, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

युवक युवतींना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यात जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईसह  उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली

पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावितशेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta