
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ..
सांगली, प्रतिनिधी– महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र 4099 लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी आधार प्रमाणिकरणासाठी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सदर लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सुनिल चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे कि, ही यादी कर्जमुक्तीची आहे. या यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम दि. ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. दि. 1 एप्रिल 2026 रोजी नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी दि. 31 मार्च 2026 रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे. या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या दि. 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम रु. २ लाखापेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने दि.०२ जून रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या व दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकित असलेल्या व दि. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून यासाठी शासनाने महाआयटी यांची नियुक्ती केली आहे. या योजनेसाठी महाआयटी यांनी तयार केलेल्या योजना पोर्टलवर सांगली जिल्ह्यातील बँकांनी एकूण 68,981 थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटी यांनी संगणकीय संस्करण केलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील एकूण 38,362 इतक्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी दि.24 जुलै 2026 रोजी प्रसिध्द केलेली आहे. या यादीमधील आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 31,094 पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु.223.8 कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.
०००००



