
फटाके फोडल्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ‘तक्रार निवारण यंत्रणा’ कार्यान्वित;उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे स्तरावर संपर्क सुविधा उपलब्ध
बुलढाणा प्रतिनिधी: फटाके फोडल्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत स्वतंत्र ‘तक्रार निवारण यंत्रणा’ कार्यान्वित करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल SUO MOTU PIL क्र. ०१/२०२६ मधील आदेशानुसार, फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण यासंदर्भातील तक्रारी स्वीकारून त्यांचे निवारण करण्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारींची योग्य चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा, खामगाव आणि मलकापूर या पोलीस उपविभागांसह विविध पोलीस ठाण्यांच्या स्तरावर संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस ठाण्याच्या ई-मेलवर अथवा दिलेल्या मोबाइल क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिल्या आहेत.
000000



