
आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक – एकनाथ शिंदे गट प्रवक्ता आमदार दीपक केसरकर…
मुंबई प्रतिनिधी
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा इरादा स्पष्ट होऊ लागल्याने बंडखोर गटात खळबळ उडाली आहे. आम्ही आजही शिवसेनेत आहोत, असा दावा या बंडखोर गटाच्या वतीने करण्यात आला आहे. शिवसेनेतून आम्ही बाहेर पडलेलो नसल्याचे सांगत आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहोत. तसेच आम्ही भाजपसोबत गेल्याच्या चर्चा सुरू आहे. मात्र आमचा गट सध्या कोणत्याही पक्षासोबत नाही, असेही यावेळी त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बंडखोर गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर केसरकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, “आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असे भासवले जात असले, तरी परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत.” बंडखोर गटातील आमदारांना अपात्र करण्यासाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव कायदेशीर नसल्याचे स्पष्ट करीत केसरकर यांनी शिवसेनेतच राहून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेकडे ५५ आमदार होते. आता आमच्याकडे ५० आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ आहे. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे अशा नेत्याला गटनेतेपदावरून कोणीही हटवू शकत नाही.



