
प्रस्तावित बांबू क्लस्टर मुरुड येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट
रायगड प्रतिनिधी:- प्राथमिक स्तरावर राज्य शासनाकडून बांबू क्लस्टरचा निदानोपयोगी अभ्यास अहवाल (डीएसआर) मंजूर आहे. प्रस्तावित बांबू क्लस्टर मधील कारागिरांनी तयार केलेल्या बांबूचे उत्पादने व त्यांच्या समस्या तसेच क्लस्टर बाबतची सद्य:स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी साळाव मुरुड येथे (बुधवार,दि.27 नोव्हेंबर2024) रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.
शासनाच्या उद्योग विभागांतर्गत शासनाच्या औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (MSI-CDP) अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबागद्वारे बांबू क्लस्टर, मुरुड येथे प्रस्तावित आहे. सुमारे 90 ते 100 बांबू कारागिरांना एकत्र करुन बांबू कारागिरांना समूह विकास योजने (क्लस्टर) मधून अत्याधुनिक यंत्र सामुग्रीचे सामुहिक सुविधा केंद्र(सीएफसी सेंटर) साळाव मुरुड येथे प्रस्तावित आहे.
औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत सामुहिक सुविधा केंद्र सुरु करण्याकरिता आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. बांबू कारागिरांनी बनविलेल्या वस्तूंना योग्य विक्री स्थळ उपलब्ध करण्याकरीता जिल्हा प्रशासन उचित कार्यवाही करेल असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी उपस्थित बांबू कारागिरांना दिले.
प्रस्तावित सामुहिक सुविधा केंद्राकरिता नियोजित जागेची पाहणीच्या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, तहसिलदार, मुरुड रोहन शिंदे, संचालक, बांबू क्लस्टर, साळाव रुपेश जामकर उपस्थित होते.
०००००००



