छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० प्रकल्प जिल्ह्यात ६५ गावांमध्ये राबविण्यात येत असून याद्वारे २२०२० हेक्टर क्षेत्र पाणलोट उपचाराखाली येणार आहे. या उपक्रमाबद्दल जनजागृती व लोकशिक्षण होण्यासाठी जिल्ह्यात पाणलोट यात्रा १४ गावांमध्ये नेण्यात येत आहे.
केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या प्रकल्पाकरीता सामाईक मार्गदर्शक सूचना २०२१ निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरुन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकाअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यात येतात, तसेच उपजीविका उपक्रम, उत्पादन पद्धती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.
या योजनेची स्थानिक समुदायामध्ये जागरुकता निर्माण करुन जनजागृती करण्यासाठी, तसेच लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत पाणलोट यात्रा सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण ७ प्रकल्प आहेत. योजनेचे सदस्य सचिव जिल्हा जलसंधारण अधिकारी आहेत. तालुका खुलताबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर, शिऊर हे प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून कृषी विभाग आहे. हा कार्यक्रम ६५ गावामध्ये सुरु असून या अंतर्गत ४३९३५ हेक्टर इतके भौगोलिक क्षेत्र, २२०२० हेक्टर इतके उपचार क्षेत्र आहे. पाणलोट यात्रेसाठी जिल्ह्यामध्ये १४ गावांची निवड करण्यात आली आहे.
या यात्रेद्वारे
१. प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना मोबाईल थिएटर व्हॅन द्वारे (VR experience) पाणलोट कामांबाबत आभासी सहलींचा अनुभव देणे.
२. गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण व्हावी, त्याअनुषंगाने हातात माती घेऊन मृद व जलसंरक्षण आणि संधारणाची शपथ घेणे. योजनेच्या प्रकल्प क्षेत्रातील नविन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे.
३. योजनेच्या प्रकल्प क्षेत्रातील नविन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे.
४. पाणलोट कामांवर श्रमदान करणे.
५. पाणलोट क्षेत्रात फळबाग लागवड करणे.
६. पाणलोट क्षेत्रातील पूर्ण झालेली मृद व जलसंधारण कामांची लोकार्पण करणे. आदी कामे करण्यात येणार आहेत, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी कळविले आहे.०००००