vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा,ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

 जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा,ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

           जालना, प्रतिनिधी- सुरक्षीत वस्तु खरेदी हा ग्राहकाचा हक्क आहे. ग्राहकाने खरेदी करतांना उत्पादनाशी निगडीत उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, मुल्य, शुध्दता आणि वापरावयाची अंतिम तारीख तपासणे महत्वाचे आहे. या जगात मोफत काहीच मिळत नसते त्यामुळे अनोळखी क्रमांकाच्या कॉलवरुन येणाऱ्या अमिषाला बळी पडू नये. तरी ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करते वेळी जागरुकता बाळगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी केले.

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहक जनजागृतीपर कार्यक्रम जालना येथील मस्त्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, तहसीलदार छाया पवार, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जी.एस.शिंदे, यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.

अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार म्हणाल्या की, ग्राहकाची फसवणूक झाल्यास उत्पादन, व्यावसायिक किंवा कंपनी यांच्याविषयीची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत करता येवू शकते. ग्राहकाला कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाची निवड करण्याचा हक्क आहे. कोणत्याही फसव्या जाहिराती, अनोळखी कॉल्सना बळी पडू नका असेही त्यांनी सांगितले.

सायबर पोलिस निरीक्षक श्री. शिंदे म्हणाले की, पुर्वी सायबर गुन्ह्यात आर्थिक फसवणूक करण्यात येत होती. तरुणांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पोस्ट समाज माध्यमांवर पोस्ट करु नये. आता नवीन प्रकारात समाज माध्यमांचा वापर करुन फेक आयडी तयार करत बदनामीकारक मजकुरासह फोटो टाकून बदनामी करण्यात येत आहे. व्हॉटसअप हॅक करुन आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पैशाची मागणी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामध्ये एपीके फाईल्सचा शिरकाव झाला आहे. एपीके फाईल्स आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करु नये, त्यामुळे आपला मोबाईल ॲक्सेस सायबर क्रिमीनलकडे जावून तो हवा तसा आपला महत्वाचा डेटा वापरुन फसवणूक करु शकतो. असे सांगून त्यांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणींची थेट व्हॉटसअप व मोबाईलमधील आवश्यक सुरक्षा सेटींग जागेवर करुन घेतली.

कार्यक्रमात पवन सांगळे विद्यार्थ्याने सायबर क्राईम विषयक निर्भिडपणे प्रश्न विचारत आपल्या मनात असलेल्या शंकेचे समाधान करुन घेतले. तसेच केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर शिक्षण विषयक युट्युब चॅनेलचा अभ्यासासाठी खुप फायदा होतो असे सांगून कार्यक्रमाचे कौतुक करत या प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयात नियमितपणे घेणे गरजेचे असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

कार्यक्रमात नारायण काळे आणि श्रीमती विद्या वाहुळे या स्वस्त धान्य दुकानदारांनी त्यांच्याकडील शिधापत्रिका धारकांची 100 टक्के ई-केवायसी पुर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सांगितले की, पुर्वीच्या काळात वस्तुविनिमय पध्दती अस्तित्वात होती. एका वस्तुच्या बदल्यात दुसरी हवी असणारी वस्तु ग्राहकाला मिळत होती. कालांतराने चलन : उदय झाला आणि विक्रेत्यांची ग्राहकांशी बांधिलकी राहिली नाही, त्यामुळे फसवणुकीच्या घटना घडण्यास सुरुवात झाली. ग्राहकांच्या संरक्षणासाठी भारतात 1986 ला पहिला ग्राहक संरक्षण कायदा तयार झाला तर त्यामध्ये बदल करुन 2019 ला नवा कायदा तयार करण्यात आला. याप्रमाणे जागतिक ग्राहक हक्क दिनाची पार्श्वभूमी सांगून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विषद केली. या कार्यक्रमास नागरिक तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी…

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठीटाकलेले सकारात्मक पाऊल, कृषी विकासाला प्राधान्य  – कृषीमंत्री धनंजय मुंडे

अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाचा खुलासा;-फोर्टीफाईड तांदुळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मोठी दुर्दैवी बातमी- गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; एकाचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

vishwatmaklokswamivarta

प्रशासनिक न्यायाधिकरणाची लोकअदालत;१७ प्रकरणात तडजोड