vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहिल्यानगरात मानव – बिबटे संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दैनंदिन आढावा

अहिल्यानगरात मानव – बिबटे संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दैनंदिन आढावा

अहिल्यानगर, प्रतिनिधी: अहिल्यानगर वनविभागातील वाढत्या मानव – बिबटे संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व वन विभागामार्फत अल्पकालीन तसेच दीर्घकालीन स्तरांवर सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा पालकमंत्री दररोज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्याकडून आढावा घेत आहेत.

अहिल्यानगर वनविभागात सुमारे १ हजार १५० बिबट्यांची अंदाजित संख्या असून ऊस, मका, नेपिअर गवत, फळबागांचे क्षेत्र व पाण्याची उपलब्धता यामुळे बिबट्यांचा अधिवास मानवी वस्तीजवळ निर्माण होत आहे. परिणामी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी राहुरी व संगमनेर येथे दोन प्रशिक्षित रेस्क्यू टीम तैनात आहेत. अलीकडील काळात मानवावर हल्ला करणाऱ्या २३ बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. खारे–करजुने परिसरातील दोन बिबट्यांना जेरबंद करून त्यांना माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवारा केंद्रात कायमस्वरूपाने ठेवण्यात आले आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील येसगाव–टाकळी परिसरातील नरभक्षक ठरलेल्या एका बिबट्याला १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गोळी झाडून ठार करण्यात आले

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून ३०० पिंजरे, ३०० ट्रॅप-कॅमेरे, रेस्क्यू उपकरणे (जॅकेट, शूज, टॉर्च-गन, संरक्षणात्मक किट) आणि १४ रेस्क्यू वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ट्रॅप-कॅमेऱ्यांद्वारे बिबट्यांच्या हालचालींची नोंद दैनंदिन घेतली जाते. संवेदनशील रस्त्यालगतची झुडपे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.

वनविभागाने वारंवार घटना घडणारी ८९७ संवेदनशील गावे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविली असून त्यानुसार या गावांतील शाळांची वेळ बदलून सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.०० अशी निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पहाटे किंवा उशिरा सायंकाळी प्रवास करावा लागू नये

सध्या वनविभागाकडे ३०५ पिंजरे आणि ३ थर्मल ड्रोन उपलब्ध असून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून त्यांचा वापर करण्यात येतो. राहुरी वनपरिक्षेत्रातील बारागाव नांदुर येथे वन्यप्राणी उपचार केंद्र (Transit Treatment Centre – फेज १) उभारणी अंतिम टप्प्यात असून जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होईल. याच ठिकाणी बिबट रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मानवहल्ल्यात सहभागी, जखमी प्राणी तसेच पिल्ले येथे उपचारानंतर आवश्यकतेनुसार ठेवण्यात येणार आहेत.

अहिल्यानगरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन बिबट्यांची नसबंदी व रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ओळख होणारी सूक्ष्मचीप शरीरात प्रत्यारोपित करण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या बिबट्यांना वनतारा (गुजरात) प्रकल्पासह इतर निवारा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबतही परवानगी मागितली आहे. यासंदर्भातील सुमारे ५०० बिबट्यांच्या टप्प्याटप्प्याने स्थलांतराचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

 

०००

 

संबंधित पोस्ट

महापौर श्रीम सुजाता पाटील यांनी विविध ठिकाणी भेटी देत केली पावसाळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी…

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक ‘संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजना’ (वाईल्डकॉन – 2025) परिषदेचा समारोप

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta