स्वच्छ व हरित नवी मुंबईचा जागर करीत 1300 हून अधिक महिलांनी यशस्वी केली महिला मिनी मॅरेथॉन
नवी मुंबई प्रतिनिधी -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने डॉ.डी. वाय पाटील युनिव्हर्सिटी अंतर्गत स्कुल ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील 1300 हून अधिक महिलांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या महिला मिनी मॅरेथॉनव्दारे स्वच्छ व हरित नवी मुंबई साकारण्याचा निश्चय करण्यात आला.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत प्राप्त सूचनांस अनुसरून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १४ मार्चपर्यंत विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेली ही महिला मिनी मॅरेथॉन डॉ.डि.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून, उपाध्यक्ष डॉ. शिवानी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आली. डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियमपासून सुरू करण्यात आलेली ही 5 किमी. अंतराची महिला मिनी मॅरेथान नवी ऊर्जा देणारी असते असे मत सहभागी महिला धावपटूंनी व्यक्त केले.
यावेळी शुभेच्छा देताना महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी जागतिक महिला दिन प्रतिकात्मक रितीने एक दिवस साजरा केला जात असला तरी प्रत्येक दिवस हा महिलांच्या सन्मानाचा असतो असे सांगितले. स्त्रीला नवनिर्मितीचे वरदान असते त्यामुळे स्त्रीशक्तीचा जागर अशा कार्यक्रमांतून होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्री.अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये निधी कनोजिया हिने प्रथम पारितोषिक पटकाविले. तसेच भूमी म्हात्रे यांनी द्वितीय व एकता राजभर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. 5 कि.मी. अंतराच्या ‘घे भरारी’ शिर्षकांतर्गत आयोजित या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील 1300 हून अधिक महिलांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला व आरोग्यपूर्ण जीवनाचे महत्वही अधोरेखीत केले.