vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

 सांगली, प्रतिनिधी- दृष्टी नसली तरी स्वप्नांना मर्यादा नसतात, हे सिद्ध करत अंध मुलांनी खेळलेल्या क्रिकेट सामन्याने सांगलीकरांना प्रेरणेचा अनोखा अनुभव दिला. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर खेळाडूंनी मैदानात दाखवलेल्या कौशल्यातून झालेल्या रोमहर्षक सामन्यात टीम शिवनेरी संघाने टीम रायगड संघावर 7 धावांनी मात केली. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील या आणखी एका उपक्रमामुळे अंध मुलांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला.

कुपवाड येथील नव कृष्णा व्हॅली इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित या ब्लाइंड क्रिकेट सामन्याला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः उपस्थित राहात या मुलांना प्रोत्साहन दिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समित कदम, तहसीलदार अश्विनी वरूटे, शिक्षणाधिकारी योजना महेश धोत्रे, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, उद्योजक बन्सीलाल ओसवाल, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नगरसेवक अभिजित कोळी, दिलीप शेलवंटे, नव कृष्णा व्हॅली इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य संगीता पागनीस, रेड स्वस्तिक सोसायटी सांगली जिल्हाध्यक्ष विजय खेत्रे, कलाशिक्षक विजय कोळेकर, मुख्याध्यापक गजानन मोरलवार, साधना माळी, प्रवीण पाखरे, रेड स्वस्तिक सोसायटीचे ओंकार चिखले, राजेंद्र जामदार, विशाल लालवाणी आदि उपस्थित होते.

आवाजाच्या आधारे चेंडूचा अंदाज घेत फलंदाजी-गोलंदाजी करताना अंध खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य पाहून मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातील 26 अंध खेळाडूंनी सहभाग नोंदवला. टीम शिवनेरी, टीम रायगड अशा दोन संघांमध्ये 15 षटकांचा सामना झाला. यामध्ये टीम शिवनेरी संघाने टीम रायगड संघावर 7 धावांनी विजय मिळवला.

 प्रथम खेळ करताना टीम शिवनेरीने 15 षटकांत 4 विकेट गमावून 117 धावा केल्या. त्यास प्रत्युत्तर देताना टीम रायगडचे 13 षटके 4 बॉल मध्ये 110 धावा काढून सर्व गडी बाद झाले. टीम शिवनेरीकडून कप्तानपदाची जबाबदारी संकेत जाधव आणि टीम रायगडकडून कप्तानपदाची जबाबदारी चिन्मय पारे यांनी पार पाडली. मॅन ऑफ द मॅच विपुल साळुंखे, बेस्ट गोलंदाज साक्षांत पवार व बेस्ट बॅटसमन म्हणून अनूप आहिर या शिवनेरी टीमच्या खेळाडूंची निवड झाली.

.प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नाणेफेक केली. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून स्वतः फलंदाजी करत मुलांचा उत्साह वाढवला.

 अंध खेळाडूंच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा हा सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिला नाही; तर उपस्थित प्रत्येकाच्या मनात प्रेरणेची नवी ज्योत पेटवून गेला. “दृष्टी नसली तरी ध्येय आहे” हे ब्रीद त्या दिवशी मैदानावर अक्षरशः जगताना पाहायला मिळाले. सूत्रसंचालन प्रविण पाखरे यांनी केले. कार्यक्रमास स्वरगंधार सांस्कृतिक मंच, सोनी ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, क्रांतिवीर दत्ताजीराव चव्हाण शिक्षण संस्था, प्रशांत चव्हाण, अशोक पाटील, नवरत्न इलेक्ट्रॉनिक मिरज यांचे सहकार्य लाभले.

0000

संबंधित पोस्ट

गुणवंत खेळाडु विद्यार्थ्यी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांनी गाठली यशाची नवी पायरी,कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात; विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇