जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
ठाणे, प्रतिनिधी): नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणारी मदत जीवावरचे संकट टाळू शकते, हे ओळखून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची विशेष मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, उल्हासनगर महानगरपालिकेच्या सिंधूभवन सभागृहात एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिर नुकतेच (४ एप्रिल रोजी) पार पडले.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्या समन्वयातून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्ती म्हणजे काय आणि तिचे विविध प्रकार कोणते, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही आपत्तीच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या ‘प्रथम-प्रतिसादक’ (First Responder) व्यक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणात *जीवनरक्षक प्रथमोपचार:* अपघाताच्या वेळी जखमीला तातडीने कशी मदत करावी, *सी.पी.आर. (CPR):* हृदयविकाराचा झटका किंवा श्वास थांबल्यास जीव कसा वाचवावा, *बँडेज तंत्र:* रक्तस्त्राव रोखण्यासाठी विविध प्रकारचे बँडेज बांधण्याचे कौशल्य, *टाकाऊतून टिकाऊ सुरक्षा:* घरातील टाकाऊ वस्तूंपासून आपत्कालीन सुरक्षा साधने कशी बनवावीत आणि त्यांचा वापर कसा करावा, या बाबींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक, नागरी संरक्षण दल, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तरुण पिढीचा सहभाग वाढविण्यासाठी एनसीसी (NCC), एनएसएस (NSS) आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महसूल विभागाचे नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आणि ‘आपदा मित्र-सखी’ यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
“आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता शास्त्रीय पद्धतीने मदत कार्य केल्यास जीवितहानी किमान राखता येते. हे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला सक्षम बनविण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.”, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.