
जिल्हयात कृषी विभागा मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकाऱ्यांच्या बांधावर
राज्य प्रतिनिधी -शेतक-यांना खरीप हंगामामध्ये तांत्रीक मार्गदर्शन होण्यासाठी, कृषी विभागाच्या विवीध योजना व उपक्रम या बाबत व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिध्दी व्हावी व कृषि विषयक तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पोहोचविता यावे यासाठी खरीप हंगामामध्ये क्षेत्रीय स्तरावर करावयाच्या विवीध कामांची रुपरेषा विवीध मोहीम स्वरुपातील कार्यक्रम व उपक्रमांची अंमलबजावनी करणे संदर्भात कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेमर्फत माहे एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यामध्ये क्षेत्रीय स्तरावर व्यापक प्रमाणात व मोहीम स्वरुपात कार्यक्रम घेतले जात आहेत.
सन २०२६ हवामान अंदाजानुसार सन २०२६ मध्ये प्रशांत महासागरातील ‘एल निनों स्थितीमुळे भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची (कमी पाऊस व उष्णतेची लाट) शक्यता आहे. या नैसर्गिक संकटामुळे खरीप हंगामातील उत्पादनावर घट येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना वेळीच तांत्रिक मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत गावपातळीवर ‘शिवार फेरी’ आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या द्वारे खालील प्रमुख घटकांवर भर दिला जात आह
पीक निवड व नियोजनः कमी पाण्यावर येणाऱ्या व लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड सुचवणे. सेंद्रिय निविष्ठा तयार करून त्याचा वापर करणे दशपर्णी अर्क, कंपोस्ट खत, गांडूळ खत, निमार्क, हिरवळीच्या खतांचा वापर
ई मृदा ओलावा संवर्धनः आच्छादन (Mulching) आणि बी बी एफ वापर, योग्य आंतरमशागत याद्वारे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे तंत्र प्रात्यक्षिकांसह समजावून सांगणे, कीड व रोग नियंत्रणः वाढत्या तापमानामुळे पिकांवर येणान्या संभाव्य कीड-रोगांच्या प्रादुर्भावाबाबत सतर्क करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुचवणे. पशुधन संरक्षणः चारा टंचाई यावर मार्गदर्शन करणे. पेरणीची वेळः पुरेसा पाऊस (७५ ते १०० मि.मी.) झाल्याशिवाय पेरणी न करणे. आंतरपीक पद्धतः जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे. पीक विमाः प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी ग्राम स्तरावर तसेच तालुका स्तरावर खरीप हंगामपूर्व सभांचे आयोजन करण्यात आले. या द्वारे खरीप हंगाममध्ये करावयाचे शेतीचे नियोजन व कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या मोहीम स्वरूपातील कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा याबाबत प्राथमिक माहिती शेतक-यांना देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये २५ कृषि विषयक मोहीम कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत विविध विषयांचे एकूण ७६०७ मोहीम कार्यक्रमांच्या माध्यमातून १,२४,६४७ शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये एल निनो बाबत जनजागृती, बीज प्रक्रिया मोहीम, घरचे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, हुमणी कीड व्यवस्थापन, बीबीएफ मूलस्थानी जलसंधारण, पट्टापेर पद्धत, माती परीक्षण मोहीम, जमीन सुपीकता निर्देशांक आधारित खताचा वापर जमीन आरोग्य पत्रिका वाटप, व्हाट्सअप ग्रुप, खरीप हंगाम तयारीची ग्रामपंचायत स्तरावर सभा व प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गाव निहाय प्रशिक्षण, कृषी निविष्ठा यांच्या वाजावी वापरा बाबत जनजागृती मोहीम, जैविक व सेंद्रिय निविष्ठा निर्मितीत वापर, कृषी विषयक माहिती तंत्रज्ञानाची साधने बाबत माहिती देणे, कृषी आधारित व्यवसाय यूनिट उभारणी, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन मोहीम, भात रीती यांत्रिकरण मोहीम भात पिकामध्ये युरिया उपलब्धता व वापर वाढवणे, पाणी फाउंडेशन डिजिटल शेतीशाळा, इ. मोहिमांच्या माध्यमातून कृषि विभाग शेतक-यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे
खरीप हंगामामध्ये या मोहीमस्वरूपातील कार्यक्रमांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर एल निनों स्थितीमुळे भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची (कमी पाऊस व उष्णतेची लाट) शक्यता असल्याने या नैसर्गिक संकटामुळे स्तर्शन केले जात आहे. शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षणाचे नमुने गोळा करण्याची पद्धत याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. माती परीक्षणाचे शेतीतील महत्त्व व माती परीक्षण अहवालाच्या आधारे संतुलित खतांचा वापर करणे याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी व पीक वाढीच्या प्राथमिक टप्प्यात कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या साठी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांचे तसेच ज्या पिकांचे घरगुती बियाणे शेतकरी वापरतात त्या पिकांचे बियाण्यांची उगवणक्षमतेबाबत खात्री करणे आवश्यक आहे या साठी सोयाबीन बरोबरच इतर पिकांच्याही बियाण्यांची उगवणक्षमता तपासण्याच्या पध्दतीबाबत प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. खरीप हंगामात मुख्य पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत प्रात्यक्षिक आधारित शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. कृषि यांत्रिकीकरण प्रचार व प्रसार, महाडीबीटी प्रणालीवर अर्ज वाढविणे व कृषी विभाग, कृषी सेवा केंद्र, कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी निविष्ठांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळातच काही ठिकाणी जास्त तीव्रतेच्या रसायनांचा वापर केला जातो याने पीक परिसंस्थेवर व मानवी आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात, हे टाळण्यासाठी पिक संरक्षक निविष्ठांचा संतुलित वापर करणेबाबत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. सेंद्रिय निविष्ठा तयार करणे व त्याच्या वापराबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा वापरताना घ्यावयाची काळजी व वापरलेल्या निविष्ठांची वेष्टने, रिकामे डबे यांची योग्य विल्हेवाट लावणे, कीटकनाशके व रासायनिक औषधांच्या लेबल क्लेम विषयी जनजागृती केली जात आहे.
खरीप हंगामातील विविध पिकांच्या कीड व रोग व्यवस्थापणाबाबत शेतक-यांना माहिती दिली जात आहे सर्वसाधारणपणे उसाच्या क्षेत्रात हुमणी कीड आढळून येते. हुमणी कीड व्यवस्थापनाकरिता एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. प्राधान्याने ऊस क्षेत्राच्या पट्ट्यात याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे अशा भागामध्ये तसेच इतरही क्षेत्रगत हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास त्याठिकाणी सुद्धा हुमणी कीड नियंत्रणाबाबत प्रचार, प्रसार व प्रकाश सापळे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत.कृषी विभागामार्फत खरीप व रबी हंगामात पिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास शेतकऱ्यांनी यात सहभाग नौदवून पिक वाढीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी पिक उत्पादन मिळवणे अभिप्रेत आहे. यात इतर शेतकरी प्रोत्साहित होतात व विजेत्या शेतकऱ्यांच्या पिक वाढीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत होतात. या पिक स्पर्धेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. बीबीएफ, मूलस्थानी जलसंधारण, पट्टापेर पद्धत जास्त पाऊस, उशिरा पाऊस, पावसाचा खंड यासाठी सदर उपचार अत्यंत प्रभावी आहेत याबाबतही व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केली जात आहे कृषी विषयक तांत्रिक माहिती, कृषि विभागाच्या विविध योजना जास्तीतजास्त शेतक-यापर्यंत समाज माध्यमाद्वारेही पोहोचण्यासाठी जिल्ह्याच्या कृषि विभागाचा व्हाटस अॅप चॅनल तयार करण्यात आलेला आहे, तसेच गावोगावी कयू आर (QR) Code) कोडही लावण्यात आलेले आहेत व त्यांच्या वापराबाबतही शेतक-यांना माहिती दिली जात आहे.
कृषी विषयक विविध योजना, उपक्रम व कृषी तंत्रज्ञान जास्तीतजास्त शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील आहे. तसेच सदरच्या मोहिमा यापुढील कालावधीत देखील सुरू राहणार असून शेतक-यांचे पिक उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष शेतक-यांचे बांधावर कृषि विभाग कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या मोहीम कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे.
संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
0000



